जून महिन्यातच शाळा उघडतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:15 AM2021-01-22T04:15:47+5:302021-01-22T04:15:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत आहे. आता लसीकरणदेखील केले जात आहे. पुढील दोन महिन्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत आहे. आता लसीकरणदेखील केले जात आहे. पुढील दोन महिन्यात सर्व सामान्यांनादेखील लस दिली जाणार आहे. त्यानंतर कोरोनाची भीतीदेखील कमी होईल व सर्व पुन्हा सुरळीत होईल. मार्चपर्यंत शाळा सुरू होणे कठीण असून, आता जून महिन्यापासूनच शाळा पूर्ववत सुरू होतील, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्याच्या बैठकीसाठी ते गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. आता आरोग्य क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. साधारणपणे प्रत्येक लस घेतल्यानंतर काही तरी लक्षणे दिसून येतात. कोरोना लसीच्या बाबतीतही तसेच आहे. म्हणून यापुढे लसीकरणासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढे यायला हवे, असेही मत गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान, केंद्र शासनाने भाजप नेते नारायण राणे यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरविली आहे. आता केंद्र शासनाने राज्यालादेखील आर्थिक सुरक्षा पुरवावी, केंद्राकडे अडकलेले राज्याचे त्वरित पैसे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.