कैची, वस्त्रा चालविणाऱ्या हातात आता तराजू काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 02:52 PM2020-07-25T14:52:36+5:302020-07-25T14:54:05+5:30
मतीन शेख मुक्ताईनगर , जि.जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बंद असलेली सलून दुकाने काही अटी-शर्थींवर सुरू करण्यात आली आहेत. ...
मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बंद असलेली सलून दुकाने काही अटी-शर्थींवर सुरू करण्यात आली आहेत. अद्यापही सलून चालकांची विस्कटलेली घडी बसलेली नाही. उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न सोडविण्यास अनेक सलूनचालकांनी व्यवसायच बदल केला आहे. ज्या हातांना दररोज कैची, वस्त्रा चालविण्याची सवय होती त्या हातात तराजू काटा घेत आता फळ आणि केळी वेफर्स विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवत आहे.
कोरोना संसर्गजन्य आजाराचा सर्वाधिक फटका सलून चालकांना बसला आहे. पहिल्याच लॉकडाऊनमध्ये सलग तब्बल १०५ दिवस सलून दुकाने बंद होती. पारंपरिक आणि हातावर उदरनिर्वाह असलेल्या ग्रामीण भागातील सलून चालकांच्या जीवनातील हा सर्वात बिकट प्रसंग होता. महिनाभरापासून अटी-शर्थींवर केशकर्तनालये सुरू करण्यास परवानगी मिळाली खरी परंतु अटी शर्ती अचानक पुकारण्यात येणारे जनता कर्फ्यू, दररोज वेळेची मर्यादा यामुळे सलून व्यवसाय चालविणे जिकिरीचे झाले आहे.
शर्ती अटी आणि सुरक्षा
लॉकडाऊनमुळे सलून व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेकवेळा आंदोलने करून शासनाने काही अटी-शर्थींवर केशकर्तनालये सुरू करण्यास परवानगी दिली. त्यात प्रत्येक ग्राहकाला वेगळा टॉवेल किंवा कपडा वापरण्याचा नियम असल्याने अडचणीचे ठरते. व्यावसायिकांनी केशकर्तनालयात वापरण्यात येणाºया पारंपरिक कापडाऐवजी युज अॅण्ड थ्रो कागदी चादरीचा वापर सुरू केला. एका वेळेस एकच ग्राहकास सलूनमध्ये प्रवेश दिला जात आहे. तत्पूर्वी खुर्ची सॅनिटाईझ केली जात आहे. ग्राहकाच्या हातावर सोडियम हायपोक्लोराईडचा फवारा मारला जातो. तसेच कात्री, कंगवा व इतर साहित्यही निर्जंतुक केले जात आहे. दुकानदार व ग्राहक यांचे आरोग्य अबाधित राहावे व कोरोनाला थोपविण्याचा प्रयत्न म्हणून सुरक्षा कारणांवरचा खर्च न परवडणारा झाला आहे. त्यातही ग्राहकांमधील कोरोना भीती असल्याने अनेक ग्राहक आजही सलूनमध्ये येण्याचे टाळत आहेत.
सलून सोडून केळी वेफर्स व्यवसाय
शहरातील लखन सनांसे यांच्या कुटुंबाने लॉकडाउन सुरू झाल्यानंतर महिनाभराची प्रतीक्षा केली. दुकाने काही उघडण्याची चिन्ह दिसत नसल्याने उदरनिर्वाह करण्यास आंब्याचा सिजन साधला. ज्या हातांना दररोज कैची चालविण्याची सवय होती त्या हातात तराजू काटा घेत कुटुंबातील तिन्ही भावांनी त्यांनी आपल्याच सलून दुकानासमोर आंबे विक्री सुरू केली. आंब्याचा सिजन संपल्याने पुढे काय या प्रश्नावर तोडगा काढत आता त्यानी केळी वेफर्सचा व्यवसाय सुरू केला आहे. सकाळपासून लखन चेतन आणि प्रशांत हे तिन्ही भाऊ घरी भट्टी लावून केळी वेफर्स तयार करीत करतात. दुपारी तिन्ही भाऊ वेगवेगळ्या दिशेने केळी वेफर्सचा माल घेऊन विक्री करायला निघतात.
सलून चालक नव्हे फळ विक्रेता
याचप्रमाणे सुभाष सनांसे यांनीदेखील रेडिमेड कापड दुकान टाकले. पण सध्या ग्राहक नसल्याने व्यापार मंदावला आहे. त्यांनी आता फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. आपल्या कापड दुकानासमोर त्यांनी फळे विक्री दुकान सुरू केली आहे. येथेही व्यवसाय रुळावर आला असताना हे क्षेत्र क्वारंटाईन झोनमध्ये आल्यामुळे त्यांना काही दिवस फळ विक्री थांबवावी लागली आहे.
कोरोना महामारीमुळे सलून व्यवसाय कोलमडला आहे. लॉकडाऊनमुळे तीन महिने दुकाने बंदमुळे व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. आता अनलॉकमध्ये नियम शर्ती अटीमुळे व्यवसाय चालविणे कठीण झाले आहे. अनेक समाजबांधवांनी उपजीविका चालविण्यासाठी व्यवसाय बदलविला आहे. हातावर पोट भरणाºया सलूनचालकांना शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा आहे.
-प्रमोद सनांसे, शहराध्यक्ष, नाभिक समाज, मुक्ताईनगर