व्याप्ती वाढली, सुरक्षा व्यवस्था कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 09:58 PM2019-12-16T21:58:28+5:302019-12-16T21:59:26+5:30
जळगाव : जिल्हा सामान्य रूग्णालयाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय झाले, नाव व व्याप्ती वाढली मात्र, महत्त्वाची सुरक्षा व्यवस्था ...
जळगाव : जिल्हा सामान्य रूग्णालयाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय झाले, नाव व व्याप्ती वाढली मात्र, महत्त्वाची सुरक्षा व्यवस्था आधीपेक्षाही बिकट असल्याचे चित्र सर्व्हेक्षणातून समोर आले आहे़ जिल्हा रूग्णालयात कुणीही, कोणत्याही वार्डात, अगदी बिनधास्त फिरू शकतो, अडवायला विचारणा करायला कुणीही नाही, ही गंभीर बाब पाहणीतून उघड झाली आहे़
जिल्हा रूग्णालयात एका मद्यपीने आपात्कालीन कक्षात गोंधळ घातला होता, यात परिचारिका कमालीच्या घाबरल्या होत्या, मात्र या मद्यपीला अडवायला कुठलीही यंत्रणा नव्हती या प्रकारामुळे एका मोठ्या यंत्रणेचा सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे़
यापार्श्वभूमीवर रविवारी पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत़
रविवारी परिस्थिती बिकट
रविवारी सुटी असल्यामुळे डॉक्टर्स उपस्थित नसतात, त्यामुळे ऐनवेळी आलेल्या रूग्णांचे हाल होतात, असे चित्र वारंवार समोर आले आहे़ प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या भरवशावर रविवारी हे रूग्णालय असते़ दुसऱ्या व चौथ्या शनिवारीही हीच परिस्थिती असते़ मनुष्यबळाचा अभाव हा प्रश्न यामुळे प्रकर्षाने समोर आला आहे़
जिल्हा रूग्णालयात सध्या २० सुरक्षा रक्षक नेमलेले असताना आपत्कालीन विभागात एकही सुरक्षा रक्षक नसल्याने कर्तव्यावर असणारे डॉक्टर, परिचारिका, शिकाऊ डॉक्टर यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, असे आपत्कालीन विभागाच्या प्रमुख सुरेखा लष्करे यांनी सांगितले़ शनिवारी शासकीय मालमत्तेची तोडफोड झाली अतिशय खेदाची गोष्ट आहे़ रुग्णालयातील पोलीस चौकी सुद्धा नावालाच आहे, तक्रार देखील चौकीतील पोलीस नोंदवून घेत नाहीत कारण यांना ते अधिकार नाहीत असे सांगितले जाते़ कर्तव्यावर असणाºया डॉक्टरांना जिल्हापेठ मध्ये जाऊन तक्रार नोंदवावी लागते त्या कालावधीत रुग्णालयात कोणती आपत्ती निर्माण झाली तर याला जबाबदार कोण?यासाठी स्वतंत्र पोलीस चौकी किंवा सद्याच्या पोलिसचौकीत असणारे पोलिसांच्या अधिकारात वाढ आणि सुरक्षा रक्षक यासाठी वरीष्ठाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती लष्करे यांनी दिली़
बाळाचे अपहरण मात्र यंत्रणा सुस्तच
काही वर्षांपुवी जिल्हा रूग्णालयातून एका महिनाभराच्या बाळाचे एका महिलेने अपहरण केले होते़ या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती़ मात्र, ऐवढ्या मोठ्या घटनेनंतरही नवजात बालके व प्रसूती कक्षा बाहेर सुरक्षा रक्षकच थांबत नसल्याचे चित्र आहे़ जिल्हा रूग्णालयाती सीसीटीव्हीची यंत्रणा शो-पीस ठरत आहे़ त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय नामकरण तेवढे झाले, कर्मचारी वर्ग झाले मात्र, मुलभूत सुविधा व सुरक्षांचा प्रश्न अजुनही सुटलेला नसल्याचे चित्र समोर आले आहे़
अनुभव १
जिल्हा रूग्णालयाच्या बाहेर दोन सुरक्षा रक्षत थांबून होते मात्र, ते वाहनधारकांना वाहने समोर लावू नका हे सांगत होते़ आत गेल्यावर पौलीस चौकीत केवळ एक पोलीस बसलेले होते़
अनुभव २
आपात्कालीन कक्षात तीन कर्मचारी होते, मात्र एकही रूग्ण नव्हता, शिवाय मोठी घटना घडूनही या ठिकाणी येणाऱ्यांना विचारपूस करणारे कोणीच नव्हते़
अनुभव ३
जिल्हा रूग्णालयाच्यात आत जात असतानाही कोणीही विचारणा केली नाही़
अनुभव ४
नवजात शिशू काळजी विभागाच्या समोरही नातेवाईक थांबून होते, या कक्षात कोणीही ये- करू शकत होते़ या अत्यंत महत्त्वाच्या कक्षांजवळही कसलीही सुरक्षा यंत्रणा नव्हती़
अनुभव ५
पुरूष कक्षाकडे जात असतानाही कोणीही अडवणूक केली नाही़ या कक्षातही काही रूग्ण व दोन कर्मचारी उपस्थित होते़