स्थिर सर्व्हेक्षण पथकांच्या करड्या नजरेतही आरटीओ चेकपोस्ट नाक्यावर पंटरांकडून वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 03:51 PM2019-04-10T15:51:52+5:302019-04-10T16:32:46+5:30
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील आचारसंहितेच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या चोरवड मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावर नियुक्त करण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकांच्या करड्या नजरेतही साखळी पद्धतीने ओव्हरलोड वा विना परवाना वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई न करता संबंधित मोटार वाहन निरीक्षकांनी रात्रंदिवस आपापल्या पंटरांकडून सोयीस्कररीत्या वसुलीचा गोरखधंदा मांडल्याची आचारसंहितेच्या गर्तेत मोठी चर्चा आहे.
रावेर, जि.जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील आचारसंहितेच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या चोरवड मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावर नियुक्त करण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकांच्या करड्या नजरेतही साखळी पद्धतीने ओव्हरलोड वा विना परवाना वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई न करता संबंधित मोटार वाहन निरीक्षकांनी रात्रंदिवस आपापल्या पंटरांकडून सोयीस्कररीत्या वसुलीचा गोरखधंदा मांडल्याची आचारसंहितेच्या गर्तेत मोठी चर्चा आहे.
निवडणुका निर्भयतेने तथा शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने बेकायदेशीरपणे मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी कुणी पैसा, दारू वा शस्त्रास्त्रांचा वापर करू नये, यासाठी स्थिर सर्व्हेक्षण पथकांची सीमा तपासणी नाक्यांवर नाकाबंदी करून भरारी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने चोरवड या मध्य प्रदेश सीमेवरील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर स्थिर सर्व्हेक्षण पथकाची इन-कॅमेरा नियुक्ती करण्यात आली आहे. कोणताही उमेदवार वा राजकीय पक्षांकडून अवैध दारू, पैसा वा शस्त्रास्त्रे आयात होऊ नयेत म्हणून बेकायदेशीर कृत्यावर आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने पथकाचा तिसरा डोळा उघडला आहे.
मात्र उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रशासनानेच या स्थिर सर्व्हेक्षण पथकाच्या करड्या नजरेवर झापडी बसवून बेकायदेशीर वसुली होत असल्याचे चित्र आहे. चोरवड सीमा तपासणी नाक्यावर एकीकडे स्थिर सर्व्हेक्षण पथकातील नियुक्त अधिकारी व पोलीस वाहनांची कसून तपासणी करून चौकशी करीत असताना दुसरीकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षकांची खासगी पंटर मोटार वाहनाच्या सहा, दहा, बारा वा चौदा चाकी अवजड वाहनांच्या ‘ओव्हरलोड’ची अवैध वसुली होत असल्याची गंभीर बाब झोपी गेलेल्या शासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी असल्याची टीका जनसामान्यांमधून होत आहे.
क्षमतेपेक्षा जास्त भार असलेल्या व नियमीतपणे या सीमा तपासणी नाक्यावरून ये-जा करणाऱ्या ठरावीक ट्रान्सपोर्टच्या अवजड वाहनांची या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नाक्यावरील अधिकाऱ्यांशी साखळी पद्धतीने अवैध वसुलीची नाळ जुळली असल्याचा भंडाफोड राज्याचे तत्कालीन परिवहन राज्यमंत्री संजय सावकारे यांनी चोरवड सीमा तपासणी नाक्यावर अकस्मात धाड टाकून केला होता. कथित कार्डधारकांना कितीही ओव्हरलोड असला तरी उपप्रादेशिक परिवहन विभागाची दंडात्मक पावती न फाडता वैयक्तिकरित्या संबंधित मोटार वाहन निरीक्षकांची ठरलेली रक्कम पंटरांकडून वसुली करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची ती बाब अव्याहतपणे सुरू आहे.
भुसावळ-नागपूर महामार्गावरील पुरनाड सीमा तपासणी नाक्यावर आॅनलाईन सीसीटीव्हीचे अधिपत्याखाली कायदेशीर वसुली सुरू असल्याने त्या मार्गावरील बहुतांशी ओव्हरलोड रहदारी खानापूर -चोरवड-लोणी मार्गे मोठ्या प्रमाणात वळली आहे. परिणामी दिवस व रात्रभरात रहदारीतील हजारो वाहनांकडून खाजगी पंटर किती वसुली करतात आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या तिजोरीत किती कर टाकतात? हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे.