जप्त वाळूचे ट्रॅक्टर ‘गायब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 03:56 PM2019-05-28T15:56:31+5:302019-05-28T15:57:13+5:30
धरणगाव : तहसीलमधून वाहने पळविणे सुरुच
धरणगाव : येथील तहसील कार्यालय आवारातून अवैध वाहतूक करणारे डंपर व ट्रॅक्टर पळविण्याचे प्रकार सुरुच आहेत. पुन्हा एक ट्रॅक्टर २४ रोजी अज्ञातांनी लांबविल्याने धरणगाव पोलिसात महसूल प्रशासनाने २७ रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे.
अवैध वाळू व गौण खनिज वाहतुकीचा केलेला लाखावर दंड बुडविण्यासाठी व चोरीचा गुन्हा दाखल होवून तपास सुरुच राहत असल्याने आरोपींकडून वाहने पळविण्या हा फंडा सर्रासपणे वापरला जात आहे. मात्र यामुळे दंड तर सुटणारच नाही वरुन चोरीच्या गुन्ह्यात सापडल्यानंतर आरोपी पुन्हा गुन्ह्यात अडकत असल्याचे महसूल प्रशासनाचे म्हणणे आहे.
यासंदर्भात तलाठी अनिल प्रभाकर सुरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महसूल प्रशासनाने दि.२४ जानेवारी २०१९ रोजी रमेश मधुकर तायडे (रा.बांभोरी प्र.चा.) यांच्या मालकीचे अवैध वाळू वाहतूक करणारे टॅÑक्टर क्र.एमएच-१९ सी ३२३० हे जप्त करुन मालकास तहसीलदार यांनी दंड ठोठावला होता. मात्र दंडाची रक्कम मालकाने न भरल्यामुळे जप्त केलेले सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेले होते.
२४ मे च्या दुपारी ४ वाजेनंतर व दि.२५ मे च्या सकाळी ८ वाजे दरम्यान कुणीतरी अज्ञात व्यक्तीने हे ट्रॅक्टर येथून नेले. हा प्रकार लक्षात आल्यावर महसूल प्रशासनाकडून धरणगाव पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पळवून घेवून गेलेले
टॅक्टर हे ट्रॉली मालकाकडे कसे?
धरणगाव तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेले एक विना पासिंगचे चांदसर येथील अवैध वाळू वाहतूक करणारे टॅक्टर (ट्रॉली क्र.बीएन ९६१३) हे अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार दाखल आहे. ते दंड न भरता लांबविलेले चोरीचे गुन्हे दाखल असलेले ट्रॅक्टर चांदसर गावात फिरत असल्याची चर्चा आहे.
चार गुन्हे दाखल मात्र तपासच सुरु
महसूल प्रशासनाने जप्त केलेले अवैध वाळूचे डंपर तसेच ट्रॅक्टर चोरी झाल्याचे चार गुन्हे धरणगाव पोलीसात दाखल झालेले आहेत. मात्र अद्याप एकाही घटनेचा तपास लागलेला नाही. हा तपास केव्हा लागाणार की वषार्नुवर्षे सुरुच राहणार का...? असा प्रश्न सुज्ञ नागरीक विचारत आहे.