एरंडोल, कासोदा उपबाजार समितीला ‘सील’
By admin | Published: March 4, 2017 12:27 AM2017-03-04T00:27:07+5:302017-03-04T00:27:07+5:30
जळगाव पीपल्स बँकेची कारवाई : २ कोटी रुपयांची थकबाकी
एरंडोल : जवळपास २ कोटी रुपयांच्या थकीत कर्जप्रकरणी जळगाव पीपल्स को-आॅप. बँकेने गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास येथील उपबाजार समितीला सील लावण्याची कारवाई केली. दरम्यान या समितीचा फ्यूज काढून विद्युत पुरवठाही बंद करण्यात आला आहे. तसेच समितीच्या आवारातील ओला मका, हरभरा व ज्वारी इ.माल उचलून नेण्यासाठी व्यापाºयांना सोमवारपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रमाणेच कासोदा उपबाजार समितीतही कारवाई करण्यात आली.
धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत एरंडोल येथे उपबाजार समिती कार्यरत असून जवळपास १० वर्षांपूर्वी टी.एम.सी. योजनेंतर्गत जळगाव पीपल्स बँकेकडून सुमारे ४ कोटी रु. कर्ज घेण्यात आले. त्यापैकी काही रकमेची परतफेड करण्यात आली. तथापि २ कोटी कर्ज थकीत आहे. बँकेने कर्ज वसुलीसाठी वेळोवेळी तगादा लावला. पण धरणगाव बाजार समितीने उर्वरित कर्जाची परतफेड केली नाही.
परिणामी बँकेने सेक्युरिटीटायझेशन अॅक्टप्रमाणे बाजार समितीची मालमत्ता जप्त करण्याची व एरंडोल उपबाजार समितीला सील लावण्याची कारवाई केली. या उपबाजार समितीच्या कार्यालयाला सील लावण्यात आले व नोटीस लावण्यात आली. याशिवाय प्रवेशद्वाराच्या मुख्य गेटलाही नोटीस लावण्यात आली आहे. ‘ही मालमत्ता दी जळगाव पीपल्स को-आॅप. बँक लि. जळगाव यांचे ताब्यात आहे’ असा फलक गेटवर लावला आहे.
एरंडोल उपबाजार समितीची सुमारे १० एकर जागा असून पैकी ५ एकरात बांधकाम करण्यात आले आहे. थकीत कर्ज भरण्यासाठी बाजार समितीने उर्वरित ५ एकर जागा विक्रीसाठी निविदा काढल्या; परंतु प्रतिसाद न मिळाल्यामुळे जागा विकणे शक्य झाले नाही. त्यामुळे बँकेचे कर्ज थकीत राहिले. दरम्यानच्या काळात शासनाने खासगी बाजार समित्यांना परवानगी दिल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला कापूस खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून येणाºया बाजार फीचे उत्पन्न कमी झाले, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
सध्या एरंडोल उपबाजारात ओला मका अदमासे २ ते ३ हजार पोते, हरभरा ६० पोते, ज्वारी १५० पोते याप्रमाणे शेतमाल आहे. शांताराम जगन्नाथ पाटील (एरंडोल), चुडामण दगडू पाटील (धारागीर) या शेतकºयांना विक्रीसाठी आणलेला गहू मार्केट बंद असल्यामुळे घरी परत न्यावा लागला. या दोघा शेतकºयांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करून ‘आम्हाला कोणी वाली उरला नाही, म्हणूनच शेतकºयांना बीबीसीत खरेदीपासून ते माल विक्री करेपर्यंत संकटांना सामोरे जावे लागते’ अशी खंत व्यक्त केली.
(वार्ताहर)
उपबाजार बंद राहिल्याने शेतकºयांचे नुकसान होणार आहे. ऐन रब्बीचा शेतमाल बाजार समितीत आणण्याची सुरुवात झाली तोच बाजार समिती बंद झाली. सचिन जाखेटे (व्यापारी)
व्यापाºयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. सर्वात जास्त फटका शेतीमालाला बसणार आहे. मनोज तोतले (व्यापारी)
पीपल्स बँकेच्या थकीत कर्जापोटी शुक्रवारी दुपारी ४ लाखांचा धनादेश देण्यात आला असून सायंकाळी एरंडोल येथील व्यापाºयांची बैठक घेऊन त्यांचेकडून अनामत घेऊन रक्कम बँकेला देणार, तसेच कासोदा येथे शनिवारी बैठक घेऊन अनामत जमा करण्यात येतील व जास्तीत जास्त रक्कम कर्जापोटी जमा करण्यात येईल. -भीमराव बाबूराव पाटील, सभापती
धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती