लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीजे मार्केटमध्ये एक दुकान सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:15 AM2021-04-11T04:15:42+5:302021-04-11T04:15:42+5:30

उपायुक्तांची कारवाई : जास्त गर्दी झाल्याने दोन मेडिकल व्यावसायिकांना पाच हजारांचा दंड जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या ...

Sealed a shop in BJ Market for violating lockdown | लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीजे मार्केटमध्ये एक दुकान सील

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीजे मार्केटमध्ये एक दुकान सील

Next

उपायुक्तांची कारवाई : जास्त गर्दी झाल्याने दोन मेडिकल व्यावसायिकांना पाच हजारांचा दंड

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये दुकान उघडण्यास बंदी असतानाही शनिवारी दुपारी बीजे मार्केटमध्ये डिजिटल बॅनर बनविणाऱ्या व्यावसायिकाने दुकान उघडे ठेवून व्यवसाय करत असल्याचे आढळून आल्याने उपयुक्तांनी हे दुकान सील केले आहे, तर फिजिकल डिस्टन्सिंगबाबत कुठल्याही उपाययोजना न करता मेडिकलसमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी आढळून आल्याने या दोन्ही मेडिकल व्यावसायिकांवर प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली.

कोरोना वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शनिवारी सकाळी मनपा अतिक्रमण विभागाने या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत शहरातील फुले मार्केट, दाणाबाजार, सुभाष चौक, जने बसस्थानक परिसर यासह शहरातील विविध भागांत जाऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांना बीजे मार्केटमध्ये साई डिजिटल बॅनर नावाचे दुकान उघडे दिसले. यावेळी उपायुक्त संतोष वाहुळे यांनी शासनाच्या सूचनेनुसार दुकान बंद करण्याच्या सूचना असतानाही दुकान उघडे ठेवल्याप्रकरणी जाब विचारत हे दुकान अतिक्रमण कर्मचाऱ्यांच्या मदतीने सील केले. या दुकानदारात सोमवारी नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा विभागातर्फे सांगण्यात आले. तसेच पंचमुखी हनुमान मंदिराजवळील शोभा हॉस्पिटलच्या पॅसेजमधील मेडिकल व त्या शेजारीच पुन्हा असलेल्या एका मेडिकलमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगच्या दोन्ही मेडिकल व्यावसायिकांनी कुठल्याही उपाययोजना राबविलेल्या दिसून आल्या नाहीत. त्यामुळे संतोष वाहुळे यांनी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी दोन्ही व्यावसायिकांवर प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची कारवाई केली. दरम्यान, वाहुळे यांनी अचानक सुरू केलेल्या कारवाई मोहिमेमुळे विक्रेत्यांची धावपळ उडालेली दिसून आली.

इन्फो:

तर कडक कारवाई करण्याचा दिला इशारा

उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सकाळी बाजारपेठेची पाहणी करताना काही ठिकाणी व्यावसायिक दुकानांसमोर राहून दुकाने उघडण्याच्या तयारीत दिसून आले. शनिवार असल्याने नेहमीप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाजारात आले होते. यावेळी उपायुक्तांनी व्यावसायिकांना शासनाच्या सूचनांचे पालन करून दुकाने न उघडण्याचे आवाहन केले, तर जे व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. यामुळे बाजारपेठेत अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंदच होती.

Web Title: Sealed a shop in BJ Market for violating lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.