जप्त केलेला माल चोरून नेणाऱ्याचे दुकान सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:32 AM2020-12-16T04:32:01+5:302020-12-16T04:32:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - कोरोना काळात शासनाने घातलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या व मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाने जप्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - कोरोना काळात शासनाने घातलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या व मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाने जप्त केलेला माल चोरून नेणाऱ्यांच्या दुकानासह एकूण तीन दुकाने मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सील केली आहेत. यासह रस्त्यालगत अनधिकृत व्यवसाय थाटणाऱ्या ३९ हॉकर्सचा मालदेखील मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाने जप्त केला आहे. मनपाकडून मंगळवारी शहरातील मध्यवर्ती भागातील अनधिकृत हॉकर्सवर जोरदार कारवाई करण्यात आली.
मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता फुले मार्केटमध्ये जावून पाहणी केली. या ठिकाणीही काही हॉकर्सने आपली दुकाने थाटली होती. याठिकाणीही मनपाकडून कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान, हॉकर्स व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दीक वाददेखील झाला.
यानंतर उपायुक्तांनी आपला मोर्चा ग.स.सोसायटी भागातील परिसरात पाहणी केली. यावेळी जैन कलेक्शन या दुकानात एकाच वेळी ४० पेक्षा अधिक ग्राहकांची गर्दी दिसून आली. उपायुक्तांनी थेट हे दुकान सील करण्याच्या सूचना दिल्या. मनपा कर्मचाऱ्यांनी दुकान सील करण्याच्यावेळेसही काही प्रमाणात वाद झाला, तसेच एका दुकानदाराने आपला माल रस्त्यालगत ठेवला होता. हा माल जप्त केल्यानंतर संबधित दुकानदाराने ट्रॅक्टरमध्ये ठेवण्यात आलेला माल चोरून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर या दुकानदाराचे दुकानदेखील मनपाकडून सील करण्यात आले. यासह या भागातील ऱस्त्यालगतदेखील व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सवरदेखील मनपाकडून कारवाई करण्यात आली.