संशयितांचा घेणार शोध : सामाजिक संस्था व मनपाच्या १०० पथकांकडून सोमवारपासून सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 10:47 PM2020-07-05T22:47:01+5:302020-07-05T22:47:52+5:30

२० दिवसात ५ लाख नागरिकांची करणार प्राथमिक तपासणी

Search for suspects: Survey from 100 organizations of social organizations and corporation from Monday | संशयितांचा घेणार शोध : सामाजिक संस्था व मनपाच्या १०० पथकांकडून सोमवारपासून सर्वेक्षण

संशयितांचा घेणार शोध : सामाजिक संस्था व मनपाच्या १०० पथकांकडून सोमवारपासून सर्वेक्षण

Next

जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची वाढत जाणारी संख्या पाहता महापालिकेकडून आता शहरात सोमवारपासून संशयित रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या सर्वेक्षणात शहरातील प्रत्येक भागातील नागरिकांची प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी मनपाकडून एकूण १०० पथके तयार करण्यात आले असून एका पथकात चार सदस्यांचा समावेश राहणार आहे. मनपासह शहरातील प्रमुख सामाजिक संस्थांचे पदाधिकारीदेखील सहभागी होणार असून २० दिवसात शहरातील ५ लाख नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दीष्ट मनपा प्रशासनाने ठेवले आहे.
मनपाकडून हाती घेण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये शहरातील प्रत्येक नागरिकाचे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. त्यासह आॅक्सिमीटरव्दारे तपासणी केली जाणार आहे. या तपासणीनंतर मधुमेह किंवा इतर व्याधी असलेल्यांची यादी तयार करून मनपाच्या वैद्यकीय विभागाकडून संबधितांची माहिती जमा केली जाणार आहे. काही दिवस प्रत्यक्ष किंवा संपर्काव्दारे या रुग्णांवर लक्ष ठेण्यात येणार आहे. तसेच ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षणे आढळली अशांना घरातच क्वारंटाईन केले जाणार आहे. तसेच काही दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवून जर लक्षणे वाढत गेले तर मनपाकडून या संशयित रुग्णांचे स्वॅबदेखील घेतले जाणार आहेत.
कोरोनाचा रुग्ण आढळण्याआधी रुग्णापर्यंत प्रशासन पोहचणार
आतापर्यंत एखाद्या भागात कोरोनाचा रुग्ण आढळ््यानंतरच संपूर्ण यंत्रणा त्या रुग्णांपर्यंत किंवा त्या भागात आपल्या सुविधा पुरवत होती. मात्र, आता मनपाने आपल्या नियोजनात बदल केला असून एखाद्या भागात रुग्ण आढळण्याआधीच संशयित रुग्णांचा शोध घेवून रुग्णांपर्यंत पोहचण्यावर आता मनपाने लक्ष दिले आहे. यामुळे रुग्णाला लवकर उपचार मिळतील व त्याच्या संपर्कात येणाऱ्यांचीही संख्या कमी होईल, असा विश्वास मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
सामाजिक संस्थाच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांचाही पुढाकार
आतापर्यंत शहरात राबविण्यात आलेल्या सर्वेक्षणात केवळ मनपा कर्मचाºयांचा समावेश होता. मात्र, सोमवारपासून राबविण्यात येत असलेल्या मोहीमेत शहरातील सर्व प्रमुख सामाजिक संस्था, विविध युवक संघटना व सार्वजनिक गणेश मंडळाचेही पदाधिकारी सहभागी होणार आहे. यासह प्रत्येक प्रभागातील नगरसेवकदेखील या सर्वेक्षणात पुढाकार घेणार असल्याने या सर्वेक्षणामुळे संशयितांचा शोध घेणे सोपे ठरणार आहे.
लॉकडाऊनमुळे घरातील सर्वच सदस्यांचा होणार सर्वे
७ जुलैपासून शहरात सात दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतेक नागरिक हे घरातच थांबणार आहेत. सर्वेक्षणात घरातील सर्वच सदस्यांची प्राथमिक तपासणी करणे सोपे होऊ शकेल. लॉकडाऊन जर झाले नसते तर एखाद्या घरात सर्वच सदस्य घरात थांबणे कठीण झाले असते व काही जणांची तपासणी झाली नसती. त्यामुळे लॉकडाऊनच्या सात दिवसांच्या काळात जास्तीत जास्त नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे आव्हान मनपा प्रशासनावर आहे.
एका पथकात चार सदस्यांचा राहणार समावेश
सर्वेक्षणासाठी एकूण १०० पथके तयार करण्यात आली आहेत. सर्व पथकांमागे एक समन्वयक नेमण्यात आला आहे. सर्व समन्वयक पथकांकडून आलेली माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कोअर कमिटीला माहिती देतील. या पथकात एक मनपा कर्मचारी, एक वैद्यकीय कर्मचारी व दोन सामाजिक संस्थांचे सदस्य राहणार आहेत. तपासणीसाठी ५० पेक्षा कमी वय असलेल्या सदस्याचीच नियुक्ती करण्यात आली आहे.
या सर्वेक्षण मोहीमेमुळे संशयित रुग्णांपर्यंत पोहचणे सोपे होणार आहे. कोरोनाचे लक्षणे असलेल्यांपर्यंत पोहचवून त्यांचा उपचार लवकर करता येणार आहे. यामुळे होणारा संसर्ग व मृत्यूदर कमी होण्यास मदत होणार आहे. त्यातच सात दिवस लॉकडाऊन असल्याने प्रत्येक भागातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी देखील होणे शक्य होणार आहे. शहरातील नागरिकांनीही मनपा व सामाजिक संस्थाच्या सदस्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे.
- सतीश कुलकर्णी, आयुक्त, मनपा

Web Title: Search for suspects: Survey from 100 organizations of social organizations and corporation from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव