गंभीर रुग्णांना जागा द्या अन्यथा परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:15 AM2021-03-18T04:15:22+5:302021-03-18T04:15:22+5:30
जळगाव : कोरोनाच्या उपचार पद्धती ठरवून दिलेल्या आहेत. त्यात लक्षणेविरहित व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटर, मध्यम ...
जळगाव : कोरोनाच्या उपचार पद्धती ठरवून दिलेल्या आहेत. त्यात लक्षणेविरहित व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटर, मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व गंभीर रुग्णांसाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल अशी ही त्रिसूत्री आहे. मात्र, खासगी रुग्णालयांनी लक्षणानुसार रुग्णांना दाखल करावे, गंभीर रुग्णांना दाखल करणे टाळू नये अन्यथा त्यांचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिला आहे.
लक्षणेविरहित रुग्णांना दाखल करून खासगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिले काढतात. मात्र, गंभीर रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. रुग्णाच्या परिस्थितीनुसारच त्याला कुठे दाखल करायचे हा निर्णय रुग्णालयांनी घ्यावा, उगाच लक्षणे नसलेल्या रुग्णांना डीसीएच किंवा डीसीएचसीमध्ये दाखल करून बेड अडवून ठेवू नयेत, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी म्हटले आहे.
निकष पाळाच; अन्यथा कारवाई!
ऐंशी आणि वीस टक्क्यांचे निकष सर्व खासगी रुग्णालयांनी पाळणे बंधनकारक आहे. यात कुठेही कुचराई आढळून आल्यास सक्त कारवाई केली जाईल. आपण स्वत: सर्व रुग्णालयांना भेटी देणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. चव्हाण यांनी सांगितले आहे.