द्वितीय, तृतीय वर्षाची एकत्रित होणार प्रात्यक्षिक परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:14 AM2021-05-30T04:14:07+5:302021-05-30T04:14:07+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची उन्हाळी परीक्षा जून महिन्यात आयोजित करण्यात आली ...
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची उन्हाळी परीक्षा जून महिन्यात आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेत द्वितीय व तृतीय विज्ञान वर्गाच्या दोन्ही सत्रांच्या प्रात्यक्षिक परीक्षा यंदा एकत्रित आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
विद्यापीठाच्या काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा प्रारंभ झाल्या आहेत, तर काही परीक्षांना जून महिन्यापासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक परीक्षांसाठीसुद्धा अर्ज मागविले जात आहेत. यंदा द्वितीय आणि तृतीय विज्ञान वर्गाच्या प्रात्यक्षिक परीक्षा एकत्रित घेतल्या जाणार आहेत. मात्र, द्वितीय व तृतीय वर्षातील सत्र ४ व सत्र ६ सोबत अनेक विद्यार्थ्यांनी सत्र ३ व ५ मधील विषयांसोबत इतर अनुत्तीर्ण विषयांचे परीक्षा अर्ज सादर केलेले नाहीत. परिणामी, परीक्षेच्या गुण यादीत अशा विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक नमूद झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सत्र ३ व ५ चे परीक्षा अर्ज तत्काळ भरावेत, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे, तसेच या विद्यार्थ्यांना दोन्ही सत्रांच्या प्रात्यक्षिक परीक्षेस प्रवेशित करावे, अशाही सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.