बोदवड शहरात पाच दिवसात दुसरी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:22+5:302021-06-28T04:12:22+5:30
बोदवड : शहरातील चोरीच्या घटनांनी तोंड वर काढले असून, चोरीच्या घटना काही केल्या थांबण्यास तयार नाही. पाच दिवसांपूर्वी शहरातील ...
बोदवड : शहरातील चोरीच्या घटनांनी तोंड वर काढले असून, चोरीच्या घटना काही केल्या थांबण्यास तयार नाही. पाच दिवसांपूर्वी शहरातील उजनी रस्त्यावरील भरवस्तीतील शिक्षकाचे घर फोडून घरातून ५० हजारांची धाडसी चोरी करण्यात आली होती. त्या घटनेला चार दिवस उलटत नाही, तोच रविवारी पहाटे शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर असलेले अशोक किराणा हे दुकान चोरट्यांनी फोडले.
अशोक किराणा या दुकानाचे दुकान मालक अशोक फबियानी हे रविवारी सकाळी उघडण्यास गेले. तेव्हा दुकानाचे एका बाजूचे शटर पूर्ण बाहेर आलेले दिसले व आत त्यांनी पाहणी केली असता दुकानातील गल्ल्यात असलेली दोन-अडीच हजार रुपयांची चिल्लर तसेच किराणा साहित्य त्यात साखर, तेल, बिस्किटे असा एकूण आठ ते दहा हजार रुपयांचा किराणा माल गेला. त्यात शटरचीही नुकसान झाले आहे.
याबाबत दुकानमालक अशोक फबियानी पोलिसांना माहिती दिली. यापूर्वीही हेच किराणा दुकान दोनवेळा दुकान फुटल्याचे त्यांनी सांगितले. हे दुकान रस्त्यावर असून चोरीच्या वाढत्या घटनांनी पुन्हा तोंड वर काढले आहे.
आधी शिक्षकाकडे चोरी
यापूर्वीही उजनी रस्त्यावरीलच भरवस्तीत असलेले बंद घर चोरट्यांनी फोडून त्यातून ४५ हजार रुपयांची घरफोडी केली. २२ रोजी सायंकाळी ही घटना उघडकीस आली होती. जगन तुळशीराम क्षीरसागर हे शिक्षक तीन-चार दिवसांपासून बाहेरगावी गेलेले होते. बंद घरातील कपाटामध्ये असलेले रोख १० हजार तसेच ३५ हजारांचे चांदीचे दागिने असा एकूण ४५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले.