दुसऱ्या पर्वात संयमाची लागणार कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:35 PM2020-04-14T23:35:19+5:302020-04-14T23:35:56+5:30

मास्क न वापरणे, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर शिक्षेचा बडगा, सुरक्षित बाजारासारखे उपक्रम लॉकडाऊनमध्ये दिशादर्शक , शेतकरी आणि ग्राहकांमध्ये समन्वय साधण्याची सुवर्णसंधी

The second test will require restraint | दुसऱ्या पर्वात संयमाची लागणार कसोटी

दुसऱ्या पर्वात संयमाची लागणार कसोटी

Next

मिलिंद कुलकर्णी
लॉकडाऊनचे दुसरे पर्व सुरु झाले. ‘जान है, तो जहान है’ असे म्हणणाºया पंतप्रधानांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या अनुभवानंतर ‘जान भी, जहान भी’ असा संदेश दिला आहे. २० एप्रिलनंतर रेड, आॅरेंज आणि ग्रीन झोन अशी विभागणी होऊन काही क्षेत्रातील व्यवहार सुरु करण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो. त्यामुळे आता पाच दिवसांनी काय होईल, हे बघायला हवे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा अनुभव सर्वव्यापी होता.
वैयक्तिक पातळीवर लॉकडाऊनची कठोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. दोन प्रसंग कायद्याच्या पातळीवर पोहोचले. नवापूरमध्ये एका तरुणाने मास्क लावला नाही म्हणून पोलिसांनी हटकले. कोरोना हवेतून पसरत नाही, म्हणून मी मास्क लावणार नाही, असे तर्कट त्याने लढवले. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयाने पाच दिवस साधा कारावास आणि हजार रुपये दंड ठोठावला. बेजबाबदार वर्तन करणाºया नागरिकाला शिक्षा ठोठावण्याची राज्यातील ही पहिली कारवाई होती. अशीच शिक्षा नंदुरबारमध्ये ‘मॉर्निंग वॉक’साठी फिरणाºया २० नागरिकांना न्यायालयाने ठोठावली आहे. प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड केला.
सार्वजनिक शिस्त, संयम हे गुण समाजातून हरवत चालले आहेत, त्याची ही दोन प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. लॉकडाऊन हा निर्णय आपल्यासारख्या सगळ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे, हे लक्षात घेऊन खरे तर वागायला हवे. ‘नागरिक शास्त्र’ हा विषय आम्ही केवळ शाळेच्या अभ्यासक्रमात शिकतो, पण तो आचरणात आणला नसल्याने असे प्रसंग उद्भवत आहेत. भाजीबाजाराचा विषय तसाच आहे. कृषी उत्पादनांना वाहतूक आणि विक्रीसाठी कृषि विभाग परवानगी देतो, परंतु, भाजी आणि फळे घेऊन विक्रेते कोठेही बसून विकतात. सामाजिक अंतराचा प्राथमिक नियम धाब्यावर बसवून नागरिकदेखील तेथे गर्दी करतात. प्रशासनाने कारवाई किती वेळा करायची यालाही काही मर्यादा आहेत. त्यामुळे रोटरी क्लबसारख्या संस्थांनी पुढाकार घेत जळगावात ‘सुरक्षित बाजारा’सारखे उपक्रम राबविले. एकून तीन ठिकाणी असे बाजार सुरु झाले आहेत. त्याला प्रतिसाद चांगला मिळत आहे.
लॉकडाऊन ही संधी मानून काही शेतकºयांनी ग्राहकाच्या दारात भाजी आणि फळे पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. समाज माध्यमांचा, डिजिटल तंत्रज्ञानाचा समर्थपणे वापर करीत शेतकरी आणि ग्राहक अशी साखळी तयार केली आहे. शेतकºयांची लूट होते, ही सार्वत्रिक तक्रार असताना अशा उपक्रमांमधूनच बाजारपेठा तयार झाल्या, तर दोन्ही घटकांचा लाभ होईल.
लॉक डाऊनचे दुसरे पर्व सर्व भारतीयांसाठी संयम आणि स्वयंशिस्तीची कसोटी पाहणारा काळ राहील. आपल्या सुरक्षेसाठी तो पाळूया.
२१ दिवसांचे पहिले संपले आणि १९ दिवसांचे लॉकडाऊनचे दुसरे पर्व सुरु झाले. पहिल्या पर्वात काही नागरिकांकडून नियमाची पायमल्ली झाली आणि त्याची शिक्षा यंत्रणेने दिली. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी संयम, स्वयंशिस्त हवी.
महसूल, पोलीस, आरोग्य या तिन्ही
यंत्रणामध्ये माणसेच आहेत. आपलेच भाऊबंद आहेत. त्यांना सहकार्य केल्यास या यंत्रणेला मूळ कामाकडे अधिक लक्ष केंद्रित करता येईल. अकारण रस्त्यांवर येणे, मास्क न वापरणे, गर्दी करणे या गोष्टी टाळणे हे आपल्या हितासाठी आहे, हे लक्षात घ्यायला हवे. या यंत्रणेतील व्यक्तींना कोरोनाची बाधा होऊनही मनोबल कायम आहे, हे अभिमानास्पद आहे.

Web Title: The second test will require restraint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव