दुसऱ्यांदा खात्यातून फी डेबिट झाली,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:17 AM2021-05-27T04:17:42+5:302021-05-27T04:17:42+5:30
परीक्षा अर्ज भरणे सुरू : युपीआयद्वारे भरणा न करण्याचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : परीक्षा अर्ज भरताना बँक ...
परीक्षा अर्ज भरणे सुरू : युपीआयद्वारे भरणा न करण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : परीक्षा अर्ज भरताना बँक खात्यातून दुसऱ्यांदाही फी डेबिट झाली आणि ट्रान्झॅक्शन अनसक्सेसफुली असा संदेश प्राप्त होत असेल तर घाबरून जाऊ नका. विद्यापीठाला संपूर्ण माहिती ई-मेलद्वारे पाठवा. लवकरच जादा भरलेली रक्कम परत करण्याची कार्यवाही केली जाईल. त्यासाठी ई-मेलची सुविधा विद्यापीठाकडून उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मे, जून, जुलै महिन्यांत होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही अभ्यासक्रमांची ही प्रक्रिया पूर्ण होऊन परीक्षांना सुरुवात देखील झालेली आहे; पण जे विद्यार्थी परीक्षा अर्ज भरत आहेत, त्यापैकी काहींना अडचणी येत आहेत. बँक खात्यातून रक्कम डेबिट होत आहे. परंतु, अर्ज भरला जात नाही. अशावेळी विद्यार्थी पुन्हा फी भरण्याची घाई करतात. पुन्हा रक्कम डेबिट होते आणि ट्रान्झॅक्शन अनसक्सेसफूल असा संदेश प्राप्त होतो. त्यामुळे जादाची रक्कम विद्यार्थ्यांकडून भरली जात आहे. हा प्रकार विद्यापीठाच्या निदर्शनास आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातून दुसऱ्यांदा फी डेबिट झाली आणि ट्रान्झॅक्शन अनसक्सेसफूल असा संदेश प्राप्त झाला असेल तर विद्यार्थ्याने जादाची भरलेली रक्कम परत मिळविण्यासाठी आपले नाव, मोबाईल क्रमांक, पीआरएन व ट्रान्झॅक्शन आयडी, बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक तसेच आयएफएससी कोड व रक्कम, आदींच्या माहितीसह आपली अडचण थोडक्यात नमूद करून ती माहिती उमविच्या रिफंडस् या ई-मेल आयडीवर पाठवायची आहे. सोबतच बँक स्टेटमेंटची स्कॅन कॉपी, एसएमएसचा स्क्रीन शॉट देखील ई-मेलद्वारे पाठवायचा आहे.
काय कराल, काय टाळाल....
परीक्षा अर्ज भरतेवेळी ऑनलाईन फी भरण्यासाठी शक्यतो डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे. तसेच युपीआयद्वारे भरणा करण्यास शक्यतो टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन परीक्षा फी भरतेवेळी काही कारणास्तव विद्यार्थ्यांच्या अकाउंटमधून फी डेबिट झाली, तथापि फॉर्म भरला गेला नसेल तर पुन्हा पेमेंट करू नये, तसेच ज्यांची परीक्षा फी बँक खात्यातून डेबिट झाली, परंतु अर्ज भरला गेला नाही, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज तीन ते चार दिवसांमध्ये बँक रिकॉन्सिलिएशननंतर ऑटो सबमिट होईल. त्यासाठी पुन्हा फी भरण्याची घाई विद्यार्थ्यांनी करू नये, असे विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे.