दुसरे प्रशिक्षण : मतमोजणीची रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:44 AM2019-05-23T00:44:51+5:302019-05-23T00:45:16+5:30
जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील सात व्हीव्हीपट तपासणार
जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून बुधवारी जिल्हा प्रशासनातर्फे अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुसरे प्रशिक्षण देण्यात आले. एक प्रकारे मतमोजणी स्थळी ही रंगीत तालीम करण्यात येऊन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसंदर्भात शनिवारी प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर बुधवार, २२ रोजी दुसरे प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक कक्षात १४ याप्रमाणे जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाची प्रत्येकी ८४ टेबलवर एकाचवेळी मतमोजणी होणार असल्याने प्रत्येक टेबलवर तीन कर्मचाºयांना बसविण्यात येऊन प्रशिक्षण देण्यात आले.
या वेळी जळगाव लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीस्थळी जळगाव लोकसभा मतदार संघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक अजयकुमार, मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तर रावेर मतदार संघाच्या मतमोजणीस्थळी रावेर लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक छोटेलाल प्यासी, निवडणूक अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कर्मचाºयांना सकाळीच समजणार टेबल
२२ रोजी ज्या टेबलावर बसवून कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले, ते कर्मचारी त्याच टेबलवर राहणार नसून त्यांना कोठे मतमोजणी करायची आहे, हे २३ रोजी सकाळी त्यांना मतमोजणी स्थळी पोहचल्यानंतरच समजणार आहे.
एकाच वेळी सर्वांना ‘सुविधा’वर समजणार माहिती
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक फेरी झाल्यानंतर त्याची माहिती निवडणूक आयोगाच्या आज्ञावलीत भरण्यात येणार आहे. ही माहिती ‘सुविधा’ पोर्टलवर भरण्यात येणार असल्याने एकाच वेळा सर्वांना ती समजू शकणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
जागेवरच मिळणार नाश्ता, जेवण
मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाºयांना त्यांच्या जागेवरच नाश्ता, जेवण मिळणार असून त्यांना कोठेही हालता येणार नाही. कर्मचाºयांना काहीही अडचण आल्यास ती दूर करण्यासाठी निरीक्षकांचीही निवड करण्यात आलेली आहे.
चुका होऊ देऊ नका
या प्रशिक्षणदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी मार्गदर्शन करून प्रकृतीची काळजी घेण्यासह चुका होऊ देऊ नका, अशा सूचना दिल्या. चुका टाळण्यासाठी उशिरही होता कामा नये, असेही सूचित केले.
जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रात सात व्हीव्हीपॅटची तपासणी
टपाली मतदान, ईव्हीएमवरील मतमोजणीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅटची सोडतीद्वारे निवड करून त्यातील मतदान स्लीपची मोजणी करण्यात येणार आहे व त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. यात बारा विधानसभा क्षेत्रापैकी जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रात मात्र सात व्हीव्ही पॅटमधील स्लीपची मोजणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी मतदान सुरु करण्यापूर्वी घेण्यात आलेले मॉक पोल उडविले गेले नव्हते. त्यामुळे या ठिकाणी दोन जादा व्हीव्हीपॅटमधील स्लीपची मोजणी करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले.