कोरोनाची दुसरी लाट, ७७२ नवे बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:16 AM2021-03-06T04:16:34+5:302021-03-06T04:16:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात कोरोनाचा कहर सुरू असून शुक्रवारी तब्बल ७७२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात कोरोनाचा कहर सुरू असून शुक्रवारी तब्बल ७७२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात शहरातील ३५९ रुग्णांचा समावेश आहे. शहरातील दोघांसह जिल्ह्यात पाच बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सर्वच आकडे चिंता वाढविणारे असून सक्रिय रुग्णांची संख्याही चार हजारांवर गेली आहे.
शुक्रवारी २०९० आरटीपीसीआर तर २८४५ ॲन्टीजन चाचण्या करण्यात आल्या. यासह आरटीपीसीआर चाचणीचे ७६५ अहवाल समोर आले. आरटीपीसीआर तपासणीत १६४ तर ॲन्टीजन तपासणीत ६०८ बाधित आढळून आले आहेत. कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असून नियमात कुठलीच ढिलाई नको, असे सांगण्यात येत आहे.
पाच बाधितांचा मृत्यू
गेल्या दोन दिवसांपूर्वीही पाच बाधितांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी जळगाव शहरातील ६६ व ६९ वर्षीय पुरुष, चोपडा तालुक्यातील ६१ वर्षीय पुरुष, धरणगाव तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष तर भुसावळ तालुक्यातील ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे.
पॉझिटिव्हिटी वाढली
आरटीपीसीआर : २४.६६ टक्के
ॲन्टीजन : २१.३७ टक्के
बरे झालेले रुग्ण २४६
सक्रिय रुग्ण ४१२६
लक्षणे नसलेले रुग्ण : ३२०२
लक्षणे असलेले रुग्ण : ९२४
ऑक्सिजन पुरवठा करावा लागणारे रुग्ण : १९१
अतिदक्षता विभागात दाखल रुग्ण : १३४
या भागात उद्रेक
खोटे नगर ९, रायसोनी नगर ७, शिवकॉलनी ६, पिंप्राळा ६, नित्यानंद नगर ५, ढाकेवाडी ५ यासह अनेक भागांमध्ये दोन आणि तीन रुग्ण आढळून आले आहेत.
दातार लॅबकडे पाठविले पाच हजार अहवाल
प्रलंबित अहवालांची संख्या थेट ७१८७ वर पोहोचल्याने आता यातील पाच हजार अहवाल हे दातार या नाशिकच्या लॅबकडे तपासणीला पाठविण्यात येणार आहे. प्रत्येक स्वॅब तपासणीचे ५५० रुपये या दरानुसार ही तपासणी होणार आहे. उर्वरित अहवाल व नियमित अहवाल हे शासकीय लॅबकडूनच तपासणी होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. यामुळे प्रलंबित अहवालांची संख्या आटोक्यात येईल, येत्या दोन ते तीन दिवसात हे प्रलंबित अहवाल स्पष्ट होतील, असेही त्यांनी सांगितले.
शासकीय सर्व केंद्र उघडणार
रुग्णांची संख्या वाढत असल्याने शासकीय सर्व कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर उघडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. पूर्वी २५ कोविड केअर सेंटर सुरू होते. आता गरजेनुसार दहा ते बारा सुरू होतील व गरज पडल्यानंतर उर्वरित सुरू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले तर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर हे सर्व ११ सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल संदर्भात अद्याप निर्णय नसून रुग्णांच्या संख्येनुसार तसा निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.