कोरोनाची ही दुसरी लाट म्हणता येईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:15 AM2021-03-14T04:15:54+5:302021-03-14T04:15:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अचानक रुग्णवाढ होणे व काही कालावधीने ती कमी होणे याला लाट संबोधले जाते. तसाच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अचानक रुग्णवाढ होणे व काही कालावधीने ती कमी होणे याला लाट संबोधले जाते. तसाच काहीसा प्रकार कोरोनाच्या बाबतीत आढळून येत असल्याने आता अचानक मोठ्या प्रमाणावर झालेली रुग्णवाढ याला कोरोनाची दुसरी लाट म्हणता येईल, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पुण्याच्या संस्थेकडून अहवाल आल्यानंतरच या कोरोनाच्या अनेक बाबी स्पष्ट होतील, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
जिल्ह्याचे चित्र बघता ऑक्टोबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत रुग्णसंख्या, संसर्ग आटोक्यात होता. मात्र, १५ फेब्रुवारी ते १० मार्चपर्यंत या कालावधीत दहा हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ आणि एका ठिकाणी नव्हेत तर संपूर्ण जिल्हाभरात टप्प्याटप्प्याने रुग्णवाढ समोर येत असल्याने याला कोरोनाची दुसरी लाट म्हणता येऊ शकते, असे मत औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी व्यक्त केले आहे. लोक मध्यंतरीच्या काळात बिनधास्त झाल्यानेही संसर्गाचा अधिक फैलाव झाल्याचेही त्यांनी मत नोंदविले आहे. असे असले तरी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण आधीपेक्षा कमी असून आता रुग्णांना थेट न्यूमोनियाची कमी प्रमाणात लागण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या आठवडाभरातील ५९०० रुग्ण
५ मार्च - ७२२
६ मार्च- ५४८
७ मार्च- ५११
८ मार्च- ५९५
९ मार्च-६०५
१० मार्च-९८३
११ मार्च-९५४
१२ मार्च -९८२
म्युटेशन की स्ट्रेन हे पुण्यावरूनच कळेल
म्युटेशन म्हणजे विषाणूत जनुकीय बदल झाले आहेत का? आणि स्ट्रेन म्हणजे हा एकाच फॅमिलीतील वेगळा विषाणू आहे का? या बाबी पुणे एनआयव्ही लॅबकडूनच समोर येतील, असेही डॉ. नाखले यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी जळगावच्या प्रयोगशाळेतून एनआयव्ही अर्थात राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था येथे ३० नमुने पाठविण्यात आले आहेत.