सलग दुसऱ्या वर्षी पिंप्राळ्यातील बारागाड्यांचा उत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:16 AM2021-05-11T04:16:45+5:302021-05-11T04:16:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भवानी मातेचा जयघोष आणि हळदी-कुंकवाच्या भंडाऱ्याची उधळण करीत दरवर्षी पिंप्राळा येथे भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भवानी मातेचा जयघोष आणि हळदी-कुंकवाच्या भंडाऱ्याची उधळण करीत दरवर्षी पिंप्राळा येथे भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त मोठ्या जल्लोषात बारागाड्या ओढण्यात येत असतात; पण कोरोनाच्या सावटामुळे सलग दुसऱ्या वर्षीही यंदा बारागाड्या ओढण्याची परंपरा खंडित होणार आहे. अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला जाणार असून, चार ते पाच नागरिकांच्या उपस्थितीत विधीवत पूजा होऊन उत्सवाची सांगता होणार आहे.
अक्षय तृतीयेनिमित्त शहरातील पिंप्राळा येथे दरवर्षी भवानी मातेची यात्रा भरते. त्यामुळे पिंप्राळा रेल्वे उड्डाणपूल ते तलाठी कार्यालयापर्यंत बारागाड्या ओढण्यात येतात. मात्र, कोरोनामुळे या उत्सवात यंदाही खंड पडणार आहे.
हनुमान व भवानी मातेचे होणार पूजन
पिंप्राळ्यातील भवानी मातेच्या यात्रोत्सवाला ७२ वर्षांची परंपरा आहे. शासनाने आखून दिलेल्या निर्बंधात हा उत्सव १४ मे रोजी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होईल. या दिवशी सकाळीच चार ते पाच नागरिकांच्या उपस्थितीत हनुमान व भवानी मातेचे विधिवत पूजन केले जाणार आहे. तसेच पिंप्राळा उड्डाण पुलाजवळ एकाच गाडीचे पूजन केले जाईल. त्यानंतर उत्सवाची सांगता होणार आहे. भगत हिलाल बोरसे यांच्या हस्ते पूजन होईल, अशी माहिती त्यांचे बंधू यांनी दिली. ग्रामस्थ रामानंदनगर पोलिसांची भेट घेणार आहेत. तसेच नियोजनाबाबत माहिती देणार आहेत.