गौण खनिज गैरव्यवहावरून जि. प. सदस्यांचा गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:26 AM2020-12-05T04:26:28+5:302020-12-05T04:26:28+5:30
जळगाव : गौण खनिजामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असतानांही, लघुसिंचन विभागाकडून माहिती दडविण्यात येत आहे. तसेच चौकशी समिती नियुक्ती ...
जळगाव : गौण खनिजामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असतानांही, लघुसिंचन विभागाकडून माहिती दडविण्यात येत आहे. तसेच चौकशी समिती नियुक्ती करुनही जिल्हा परिषदेकडून या प्रकरणी कुठलीही कारवाई केली जात नसल्यामुळे शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या जलवस्थापन सभेत सदस्या पल्ल्वी सावकारे व प्रभाकर सोनवणे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. या प्रकरणी तात्काळ कारवाईशिवाय सभेचे कामकाज होऊ न देण्याचा पवित्रा घेतला. या प्रकरणी उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी येत्या पंधरा दिवसांत चौकशी करून संबंधितांवर कारवाई आश्वासन दिले.
शुक्रवारी दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेची जल व्यवस्थापन समितीची सभा जिप अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात झाली. यावेळी व्यासपीठावर जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीलाच गौण खनिज गैरव्यवहार प्रकरणी चौकशी अहवालाचे काय झाले, प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात केली, याबाबत प्रश्न उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांनी खुलासा देण्याची मागणी केली. यावर प्रशासनाकडून या प्रकरणी अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले. यावरून पल्लवी सावकारे संतप्त होऊन,या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशी होऊन, समिती गठीत आली असतानांही जिल्हा परिषदेकडून पुढील कारवाई होत नसल्यामुळे संताप व्यक्त केला. चौकशी समितीला कागदपत्रे दिली जात नसल्यामुळे चौकशीचे काम रखडले आहे. यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी विलंब होत असल्याचा मुद्दा सावकारे यांनी मांडला.
या मुद्दावर प्रभाकर सोनवणे यांनीदेखील प्रशासनाच्या कामकाजावर आक्षेप घेतला. सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी लावून धरली. अन्यथा सभेचे कामकाज होऊ न देण्याचा ईशाराही दिला. सदस्यांची आक्रमक भुमिका पाहता बी. एन. पाटील यांनी पंधरा दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन देऊन, सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर सभेेचे पुढील कामकाज सुरळीत पार पडले.
उपअभियंता राधेश्याम सोनवणेंना काढले सभागृहाबाहेर
यावेळी राधे श्याम सोनवणे यांच्याकडील उप अभियंता पदाचा पदभार काढल्यानंतरही ते सभागृहात येऊन बसले. यानंतर सोनवणे यांनी गौण खनिज प्रकरणी सदस्यांच्या प्रश्नावर उद्धटपणे उत्तरे दिली. यामुळे सर्वच सदस्य आक्रमक झाले. सोनवणे यांच्या निलंबनाची मागणी केली. यावेळी बी. एन. पाटील यांना उद्धट वागणुकीबद्दल चांगलेच खडसावून सभागृहातून बाहेर काढले.