स्नेहाची शिदोरी अविरत राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:33 AM2020-12-15T04:33:06+5:302020-12-15T04:33:06+5:30
फोटो आहे .... जळगाव : कोरोना आव्हानात्मक परिस्थितीत एप्रिलपासून भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि जैन इरिगेशन कंपनीद्वारे ‘स्नेहाची ...
फोटो आहे ....
जळगाव : कोरोना आव्हानात्मक परिस्थितीत एप्रिलपासून भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि जैन इरिगेशन कंपनीद्वारे ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम नियमित सुरू आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जळगाव शहरातील कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम अविरत सुरू ठेवणार असल्याची घोषणा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी भवरलाल जैन यांच्या ८३ व्या जयंतीदिनी आयोजित भक्तीसुधारस या कार्यक्रम प्रसंगी केली.
अशोक जैन यांनी भवरलाल जैन यांच्या काही भावस्पर्शी आठवणी सांगत ही घोषणा केली. साधारणतः २०१५ मध्ये शहरातील कोणताही नागरिक उपाशी राहू नये, असे संवेदनशील विचार भवरलाल जैन यांच्या मनात सातत्याने येत होते. समाजाकडून आपण भरभरून घेत असतो, आपणही समाजासाठी कृतज्ञतापूर्वक नक्कीच काही केले पाहिजे, या भावनेतून भोजनाची आवश्यकता असणाऱ्यांसाठी सकाळ-संध्याकाळ भोजन उपलब्ध करून देण्यासंदर्भात भवरलाल जैन यांनी अशोक जैन यांच्याशी संवाद साधला होता. एकूणच यासंदर्भात नियोजन काय करता येईल, या संकल्पनेची अंमलबजावणी कशा प्रकारची असेल, नेमके स्वरूप निश्चित होत होते; परंतु प्रत्यक्ष ही संकल्पना सुरू करण्यात काही ना काही व्यत्यय येत राहिला. भवरलाल जैन यांचे निर्वाण होईपर्यंत ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत न आल्याची सल जैन परिवाराला होती. २५ फेब्रुवारी २०१६ रोजी भवरलाल जैन यांनी जगाचा निरोप घेतला. जैन परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक दलुभाऊ जैन यांनी त्यानंतरच्या कानमुनींच्या पहिल्या चातुर्मासात भाऊंच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ जैन समाजातील बांधवांसाठी विनामूल्य भोजनालयाची व्यवस्था केली व ती सुविधा आजही सुरू आहे.
लॉकडाऊन काळात अनेक प्रकारच्या गंभीर परिस्थितीला जनसामान्यांना सामोरे जावे लागले. भोजनाची आवश्यकता असणाऱ्यांना सेवाभावी वृत्तीने घासातला घास देण्याचा जैन परिवाराचा संस्कार येथेही कामी आला. कांताई सभागृहातून १ एप्रिल ते १२ डिसेंबर २०२० दरम्यान दोन वेळचे सुमारे आठ लाखाच्यावर भोजन पाकिटे देण्यात आली. स्नेहाची शिदोरी उपक्रम सुरू असताना भवरलाल जैन यांच्या कायम स्वरूपी भोजन उपलब्ध करण्याच्या संकल्पनेची जैन परिवारास सातत्याने आठवण होतीच. ‘स्नेहाची शिदोरी’ अव्याहत रहावी, असे जैन परिवाराद्वारा निश्चित करण्यात आले. भवरलाल जैन यांच्या ८३ व्या जन्मदिनानिमित्त ‘स्नेहाची शिदोरी’ कायम स्वरूपी राहील, अशी अशोक जैन यांनी घोषणा केली. कालानुरूप या भोजनालयाबाबत योग्य ते निर्णय निश्चित घेतले जातील; मात्र ही संकल्पना यापुढे निरंतर सुरू राहणार आहे, ज्यामुळे शहरातील कोणतीही व्यक्ती उपाशी झोपणार नाही.