गुपचूप स्वत:चा पगार वाढविला : जळगाव जिल्हा दूध संघाच्या कार्यकारी संचालकांची हकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 01:01 PM2020-02-04T13:01:07+5:302020-02-04T13:02:10+5:30
इतिवृत्तात घुसवलेला विषय लक्षात आल्याने कारवाईं
जळगाव : जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक (एमडी) संजीवकुमार गौतम यांनी स्वत:चा पगार स्वत:च गुपचूप वाढवून घेऊन तो विषय बैठकीच्या इतिवृत्तात परस्पर घुसविल्याचे इतिवृत्त मंजुरीपूर्वी संघाच्या चेअरमन यांच्या लक्षात आल्याने गौतम यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना बडतर्फ करण्यात येणार होते, मात्र नुकसान नको म्हणून राजीनामा घेण्यात आला आहे. मात्र याबाबत दूधसंघाकडून गुप्तता पाळली जात आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा दूध संघाची बैठक शनिवारी पार पडली. त्यावेळी मागील सभेचे इतिवृत्त मंजुरीसाठी चेअरमन मंदाकिनी खडसे यांच्याकडे आले.
त्यात आयत्यावेळच्या विषयात गौतम यांचा पगार वाढविण्याचा व मे महिन्यापासून वाढीव पगाराची रक्कमही देण्याचा विषयही असल्याचे आढळून आले. हा विषय सभेत झालेला नसताना इतिवृत्तात कसा आला? असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे कार्यकारी संचालक गौतम यांनीच गुपचूप हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले.
लिमये यांच्या पगाराची बरोबरी
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गौतम हे जिल्हा दूध संघात कार्यकारी संचालक पदावर परिविक्षाधीन कार्यकाळ पूर्ण करीत होते. त्यामुळे त्यांना १ लाख ८२ हजारांच्या आसपास होता.
मात्र यापूर्वीचे कार्यकारी संचालक लिमये यांचा पगार २ लाख ३० हजार रूपये होता. त्यामुळे गौतम यांनी गुपचूप स्वत:चा पगार वाढवून घेत मे महिन्यापासूनची वाढीव पगाराची रक्कमही काढून घेतली. तसेच इतिवृत्तात आयत्यावेळच्या विषयात गौतम यांना पगारवाढ देऊन मे महिन्यापासून वाढीव पगाराची रक्कम (अॅरिअर्स) देण्याचा विषयही घुसडून दिल्याचे आढळून आले आहे. याबाबत संपर्क साधला असता ग्गौतम यांनी प्रतिसाद दिला नाही.
राजीनामा घेतला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परस्पर पगारवाढ करून घेत इतिवृत्तात विषय घुसडल्याचा विषय लक्षात आल्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा झाली. तसेच गौतम यांना बडतर्फ करण्याबाबतही चर्चा झाली. मात्र त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून केवळ राजीनामा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र गौतम यांनी अद्यापही पदभार सोडलेला नाही. मंगळवारी सोडण्याची शक्यता आहे. वेळप्रसंगी एकतर्फी पदभार काढून घेण्यात येणार आहे. याबाबत मंगळवारी दूध संघ भूमिका स्पष्ट करणार असल्याचे समजते.