सुरक्षा मारहाण करून घेतला "मविप्र"चा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:16 AM2021-03-28T04:16:30+5:302021-03-28T04:16:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे, असे म्हणत मुख्य प्रवेशद्वारावरील दोन सुरक्षारक्षकांसह कर्मचाऱ्यांना मारहाण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे, असे म्हणत मुख्य प्रवेशद्वारावरील दोन सुरक्षारक्षकांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करून अॅड. विजय भास्कर पाटील गटाने शनिवारी दुपारी ''मविप्र'' संस्थेचा ताबा घेतला. दरम्यान, यावेळी दोन्ही गट समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नीलेश भोइटे यांच्या कारची काच हातोड्याने फोडण्यात आलेली आहे. त्याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्यात आले आहेत. याप्रकरणी विजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, पियुष नरेंद्र पाटील,रवींद्र देशमुख यांच्यासह सात जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान पाटील गटाने वादाचे खंडन केले असून संस्था आमच्या ताब्यात असल्याचा दावा केलेला आहे.तर भोईटे गटानेही संस्थेवर आमचाच ताबा असल्याचा दावा केला आहे.
संस्थेचे कर्मचारी रमेश दगडु धुमाळ (वय ४०, रा. चिंचोली, ता. जळगाव) यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास धुमाळ हे ड्युटीवर असताना संस्थेच्या आवारात विजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, पियुष नरेंद्र पाटील, रवींद्र देशमुख, शांताराम पाटील व महेश आनंदा पाटील हे सहा जण सुमारे ५० ते ६० जणांच्या जमावासह आले. कोर्टाने आमच्या बाजुने निकाल दिला आहे, असे म्हणत त्यांनी सुरूवातीला मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक महेंद्र देशमुख व आधार पाटील यांना मारहाण केली. यानंतर आत येऊन आवारात उभ्या असलेल्या नीलेश भोईटे यांची चारचाकी (क्र.एम.एच १९ सी.व्ही १०००) लोखंडी हातोड्याने फोडली. तसेच धुमाळ यांच्यासह त्यांचे भाऊ गणेश धुमाळ यांना पाठीवर, पायावर लोखंडी हातोड्याने जबर मारहाण करीत धमकी दिली. त्यानुसार जिल्हापेठ पोलिस ठाण्यात भादंवि कलम १४३, १४७, १४४, १४८, १४९, ३२३, ४२७, ५०४, ५०६, १८८ व १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचा फौजफाटा तैनात
या घटनेनंतर जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण पवार, सहाय्यक निरीक्षक मनोज वाघमारे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी तैनात करण्यात आला होता. नुतन मराठा महाविद्यालय आवारात पोलिस बंदोबस्त असताना संस्थेच्या कार्यालयात मानद सचिवाच्या खुर्चीवर मनोज भास्कर पाटील बसलेले होते तर इतर चार ते पाच जण बाजूला होते.
कोट...
सहा वर्षापासून संस्थेवर आमचाच ताबा आहे. तेव्हापासून आम्हीच कामकाज बघत आहोत. कार्यालयाच्या बाहेर काय वाद झाला माहिती नाही. आम्ही दालनातच बसून जनरल मिटींगची तयारी करीत आहोत.आताही न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे.
- मनोज भास्कर पाटील
कोट....
संस्थेवर आजही आमचाच ताबा आहे. त्यांना कोणताही ताबा दिलेला नाही. २२ एप्रिलपर्यंत कार्यालयात पोलीस संरक्षण मिळाले आहे. सकाळी कार्यालयात असताना कार महाविद्यालयाच्या आवारात पार्किंग केली होती. त्यानंतर कामानिमित्त दुचाकीने बाहेर गेलो. जमावाने कारची काच फोडल्याची माहिती मिळाली आहे. काही सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहेत. उद्या आणखी वेगळा गुन्हा दाखल करु.
- नीलेश भोईटे