जमिनीतून निघालेले बीजांकुर पाखरांकडून पोखरून खाण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:12 AM2021-06-30T04:12:14+5:302021-06-30T04:12:14+5:30
रावेर : मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने तथा गत आठवड्यात २३ जून रोजी आर्द्रा पर्जन्य नक्षत्राच्या आरंभी जोमदार ...
रावेर : मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने तथा गत आठवड्यात २३ जून रोजी आर्द्रा पर्जन्य नक्षत्राच्या आरंभी जोमदार पावसाची हजेरी लागली. नंतर गुरुवार, शुक्रवार व शनिवारी तथा रविवारी रात्री काही महसूल मंडळांत जोमदार तर काही मंडळांत हलक्या स्वरूपात पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्या धडाक्यात सुरू झाल्या होत्या. मात्र, पावसाची स्थिरता तालुक्यातील सर्व भागांत कायम नसल्याने अद्याप ३२ टक्के पेरण्या रखडल्या असून, ६८ टक्के पेरणी झालेल्या बीजांकुरणासाठी पावसाची नितांत गरज आहे.
रावेर तालुक्यात आजपावेतो सरासरी ८५ मि.मी. पाऊस झाला आहे. रावेर महसूल मंडळात ११० मि.मी., खानापूर महसूल मंडळात ७८, सावदा महसूल मंडळात ९२, खिरोदा प्र. यावल महसूल मंडळात ८८, निंभोरा महसूल मंडळात ७०, ऐनपूर महसूल मंडळात ७६, खिर्डी महसूल मंडळात ८१ मि.मी. पावसाची आजतागायत नोंद झाली आहे. रविवारी रात्री काही भागांत पावसाची हजेरी लागली. मात्र, काही भागांत पाऊस नव्हता. गत दोन दिवसांपासून आभाळ दाटून येत असले तरी हुलकावणी देत असल्याने बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. कारण जमिनीतून निघालेले बीजांकुर पाखरांनी पोखरून खायला सुरुवात केली आहे. यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार १५ हजार ६९९ हेक्टर बागायती कापूस, ४९७ हेक्टर जिरायत कापूस, १ हजार ६३१ हेक्टर ज्वारी, ९१५ हेक्टर मका, तूर ६२१ हेक्टर, उडीद २३० हेक्टर, मूग १४६ हेक्टर, सोयाबीन ३१ हेक्टर, हळद १ हजार ८१ हेक्टर, तर नवीन केळी ७ हजार ६४१ हेक्टर, अशी ६८ टक्के खरीप पेरणी पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले आहे.