चाहत्यांचे प्रेम पाहून दिलीपकुमार पाच दिवस थांबले होते जळगावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:12 AM2021-07-08T04:12:23+5:302021-07-08T04:12:23+5:30
जेव्हा सुपरस्टार दिलीपकुमार म्हणाले, सुरेशदादाच ‘खरे हीरो’ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीत ओळख असलेल्या ...
जेव्हा सुपरस्टार दिलीपकुमार म्हणाले, सुरेशदादाच ‘खरे हीरो’
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीत ओळख असलेल्या सुपरस्टार दिलीपकुमार यांचे जळगावशी वेगळे नाते होते. १९८७ मध्ये केवळ एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या दिलीपकुमार यांनी जळगावकर चाहत्यांचे प्रेम पाहून तब्बल पाच दिवस जळगावचा पाहुणचार घेत, जळगावकरांचे प्रेम जिंकले होते. नूतन मराठाच्या मैदानावर सुपरस्टार दिलीपकुमार यांनी दहा हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या त्या ‘दिलीपकुमार प्रेझेंट कल्याणजी-आनंदजी नाइट’च्या आठवणी आजही अनेक जळगावकरांच्या मनात घर करून आहेत.
४ जानेवारी १९८७ रोजी इकरा एज्युकेशन आणि नॅशनल स्पोर्ट्स यांच्यातर्फे नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी रक्कम जमा करण्यासाठी ‘दिलीपकुमार प्रेझेंट कल्याणजी-आनंदजी नाइट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उद्योगपती भंवरलाल जैन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जे.टी. महाजन, मुरलीधर पवार, ॲड. तानाजी भोईटे, करीम सालार, गफ्फार मलिक यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला दिलीपकुमार यांची एक झलक पाहण्यासाठी तब्बल १० हजारांहून अधिक चाहत्यांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी रक्कम जमा करण्याचे आवाहन आयोजकांनी केले होते. त्यावेळेस १३ लाखांची मदत जमा झाली होती. तर, दिलीपकुमार यांनीदेखील ५१ हजार रुपयांची देणगी या कामासाठी दिली असल्याची माहिती डॉ. करीम सालार यांनी दिली. इकरा एज्युकेशन सोसायटीने नुकत्याच सुरू केलेल्या डी.एड. कॉलेजला दिलीपकुमार यांचे नाव देण्यात आले असून, या महाविद्यालयाचे उद्घाटन अद्याप झाले नसून, संपूर्ण अनलॉकनंतर या महाविद्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती डॉ. करीम सालार यांनी दिली.
चार दिवस घालविले ‘७ शिवाजीनगर’मध्ये
शहरात दोन कार्यक्रमांसाठी दिलीपकुमार शहरात आले होते. मात्र, जळगावकरांचे प्रेम पाहून दिलीपकुमार चक्क पाच दिवस शहरात थांबले होते. विशेष म्हणजे तत्कालीन नगराध्यक्ष सुरेशदादा जैन यांच्या ७ शिवाजीनगर या निवासस्थानी दिलीपकुमार चार दिवस थांबले होते. खान्देशी भरीत, शेवभाजीचा आस्वाद घेतला होता.
सुरेशदादा जैन हे जळगावचे हीरो
जळगाव युवक बिरादरीतर्फे जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमात दिलीपकुमार यांनी आपल्या भाषणात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी केलेल्या कामांची स्तुती करत, सुरेशदादा जैन हेच जळगावचे खरे हीरो असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या वाक्यानंतर सभागृहात उपस्थित असलेल्यांनी तब्बल १० मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला होता. तसेच आपले भाषण करताना, दिलीपकुमार यांनी मला मराठीत बोलता येत नसल्याचे सांगत, ‘माझ्या मराठीत थोडी भानगड’ असल्याचे सांगत, जळगावकरांची मने जिंकली होती. या कार्यक्रमात दिलीपकुमार यांनी उपस्थित युवकांना देशभक्ती व युवक चळवळीबाबत मार्गदर्शन केले होते.