आव्हाण्यातून सातशे ब्रास वाळूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:19 AM2021-02-09T04:19:07+5:302021-02-09T04:19:07+5:30
जळगाव : वाळूमाफियांनी नदीपात्रातून उचल करून आव्हाणे गावात साठवून ठेवलेली सातशे ब्रास वाळू सोमवारी सायंकाळी महसूल व पोलिसांनी जप्त ...
जळगाव : वाळूमाफियांनी नदीपात्रातून उचल करून आव्हाणे गावात साठवून ठेवलेली सातशे ब्रास वाळू सोमवारी सायंकाळी महसूल व पोलिसांनी जप्त केली. प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे व सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत गावात कारवाईचे सत्र राबविले. यावेळी वाळू वाहतूक करणारे रिकामे तीन डंपरही जप्त करण्यात आले आहे.
आव्हाणे येथील नदीपात्रातून अवैध वाळूचा भरमसाट उपसा होत असून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी नियुक्त केलेले पथके कुचकामी ठरल्याने वाळूमाफियांना फावत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात मांडले होते. या वृत्ताची दखल घेऊन प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे व सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी अचानक ताफा घेऊन गावात धाडसत्र राबविले. नदीपात्रातही पथके गेली, मात्र ‘लोकमत’च्या वृत्तामुळे वाळू उपसा बंद होता. पथकाने गल्लोगल्ली जाऊन ठिकठिकाणी साठविलेले वाळूचे साठे जप्त केले.
सात ठिकाणी साठविली होती वाळू
माफियांनी गावात सात ठिकाणी वाळूचा साठा केला होता. एका ठिकाणी किमान शंभर ब्रास वाळू होती. स्मशानभूमी, जिल्हा परिषद शाळा व विविध कार्यकारी सोसायटींजवळ वाळूचा साठा करण्यात आला होता. अचानक झालेल्या या धाडसत्रामुळे गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. रात्री उशिरापर्यंत वाळूसाठ्याचा पंचनामा सुरू होता. दरम्यान, यावेळी तीन डंपर पथकाने पकडले, परंतु त्यात वाळू नव्हती. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे.