सीलबंद पाण्याच्या बाटल्यांचा साठा जप्त; विना परवानगी उत्पादन, एफडीएची कारवाई
By सुनील पाटील | Updated: April 19, 2024 17:10 IST2024-04-19T17:09:42+5:302024-04-19T17:10:01+5:30
या ठिकाणी उत्पादित झालेल्या बाटल्यांची जळगाव शहर, जिल्हा व गुजरातमध्ये विक्री केली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

सीलबंद पाण्याच्या बाटल्यांचा साठा जप्त; विना परवानगी उत्पादन, एफडीएची कारवाई
जळगाव : कोणतेही कायदेशीर परवानगी न घेता सुरु असलेल्या सील बंद पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांच्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी धाड टाकून ४ लाख १० हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला. हा कारखाना सील करण्यात आला आहे.
एमआयडीसीतील गुरांच्या बाजारासमोर मे. देवांश सेल्स या नावाने सील बंद शुध्द पाण्याच्या बाटल्यांचा कारखाना सुरु असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे व नाशिक विभागाचे सहआयुक्त सं.भा.नारगुडे यांना मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी शरद म. पवार यांनी सहकाऱ्यांसोबत शुक्रवारी या ठिकाणी धाड टाकली. अन्न परवान्याची मागणी केली असता कंपनी मालक कोणताच परवाना सादर करु शकला नाही.
या ठिकाणी उत्पादित झालेल्या बाटल्यांची जळगाव शहर, जिल्हा व गुजरातमध्ये विक्री केली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. या बाटल्यांवरही गुजरात पॅकींग असा उल्लेख असून याची सखोल चौकशी केली जात आहे. आकाश बालाणी नावाच्या व्यक्तीचा हा कारखाना असल्याचे सहायक आयुक्त कांबळे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. कोणताही अन्न व्यवसाय करण्याआधी अन्नपरवाना/नोंदणी प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन कांबळे यांनी केले आहे