आरटीईच्या ३०८१ जागांसाठी २९८३ विद्यार्थ्यांची निवड
By सागर दुबे | Published: April 12, 2023 07:09 PM2023-04-12T19:09:48+5:302023-04-12T19:10:07+5:30
आता निवड यादीतील विद्यार्थ्यांना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठविण्यास सुरुवात झाली आहे.
जळगाव : दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी विनाअनुदानित, स्वयंअर्थ सहायित शाळांमध्ये राखीव असलेल्या जागांसाठी ५ एप्रिल रोजी राज्यस्तरावर ऑनलाइन लॉटरी प्रक्रिया पार पडलेली होती. त्यानंतर बुधवारी दुपारी तीन वाजेनंतर आरटीई पोर्टलवर जळगाव जिल्ह्यातील २८१ शाळांमधील ३०८१ जागांसाठी २९८३ बालकांची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे.
आता निवड यादीतील विद्यार्थ्यांना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठविण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, पालकांनी मेसेजची वाट न पाहता आरटीई पोर्टलवरील "अर्जाची सद्यस्थिती"या टॅबवर पालकांना आपल्या मुलाच्या अर्जाची सद्यस्थिती कळू शकेल. निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी कागदपत्र पडताळणी करिता गटसाधन केंद्र पंचायत समिती येथे तालुकास्तर समितीकडे आपली फाईल तीन प्रतीत १३ ते २५ एप्रिल दरम्यान सादर करून पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.