जळगावच्या विद्यापीठाची महत्त्वाच्या पथदर्शी प्रकल्पासाठी निवड
By अमित महाबळ | Published: November 2, 2023 06:24 PM2023-11-02T18:24:06+5:302023-11-02T18:24:36+5:30
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांना नुकतेच पत्राद्वारे या कराराबाबत कळविले आहे.
जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ‘वर्कप्लेस रेडीनेस प्रोग्राम’ (नोकरीसाठी अत्यावश्यक बाबींची सज्जता) हा महत्वाचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यिासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची निवड केली असून, यामुळे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी प्राप्त होणार आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यापीठ व ॲडव्हान्टेज लीडरशिप सोल्युशन प्रा. लि. (तलेरंग), मुंबई आणि रैना एज्युकेशन फाऊंडेशन, नवी दिल्ली यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार केला जाणार आहे. खान्देशातील विद्यार्थ्यांसाठी हा पथदर्शी प्रकल्प नवीन दिशा देणारा ठरणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांना नुकतेच पत्राद्वारे या कराराबाबत कळविले आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक ती कौशल्य आणि तांत्रिक ज्ञानाने सुसज्ज करून इंटर्नशिप इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. अर्न्स्ट ॲण्ड यंग ही सल्लागार कंपनी राज्य शासनासोबत याबाबत काम करीत असून, या कंपनीच्या प्रतिनिधींनी विद्यापीठाला नुकतीच भेट देवून हा प्रकल्प राबविण्याबाबत चर्चा केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘वर्कप्लेस रेडीनेस प्रोग्राम’ हा पथदर्शी प्रकल्प ७० दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर चालविला जाणार आहे.
प्रकल्पाचे टप्पे
पहिल्या टप्प्यात विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांची चाचणी परीक्षा घेतली जाईल. त्यातील कामगिरीवर १० टक्के विद्यार्थ्यांची दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. तलेरंग ही संस्था निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १२ सॉफ्टस्किल्स आणि १४ हार्डस्किल्सचे प्रशिक्षण देईल. हे प्रशिक्षण हायब्रीड मोड पद्धतीने दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार शिफारस केलेली १०० तासांची व्हिडीओ सामग्री देखील दिली जाणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात प्रशिक्षणातील १० टक्के विद्यार्थ्यांची उद्योग प्रकल्पांतील इंटर्नशिपसाठी निवड केली जाईल. हे सर्व उद्योग प्रकल्प नामांकित असतील. या प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांचे परिचय पत्र (रेझ्युम) अपडेट करण्यासाठी तलेरंगच्या वतीने विद्यार्थ्यांना सहकार्य केले जाईल. त्यासाठी इंटर्नशिप ॲप्लिकेशन विकसित केले जाणार आहे.
प्रशिक्षण मोफत
हे सर्व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मोफत दिले जाणार आहे. रैना एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने या प्रकल्पाला निधी दिला जाणार आहे. या प्रकल्पाचा तीन ते साडेतीन हजार विद्यार्थ्यांना लाभ होईल, अशी अपेक्षा असल्याची माहिती कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी दिली.