विद्यापीठाच्या तीन रासेयो स्वयंसेवकांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:14 AM2020-12-29T04:14:35+5:302020-12-29T04:14:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचालनसाठीच्या होणाऱ्या शिबीरासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचालनसाठीच्या होणाऱ्या शिबीरासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीन स्वयंसेवकांची निवड झाली आहे.
एकाचवेळी तीन विद्यार्थ्यांची निवड होण्याची संधी विद्यापीठाला बऱ्याच वर्षानंतर प्राप्त झाली आहे. दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात सहभागी व्हावे ही रा.से.यो.च्या स्वयंसेवकांची इच्छा असते. हैद्राबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या पूर्व संचलन निवड व चाचणी शिबीरासाठी विद्यापीठातर्फे चार स्वयंसेवक सहभागी झाले होते. त्यातील तीघांची दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलन शिबीरासाठी निवड झाली आहे. यामध्ये जी.टी.पाटील महाविद्यालय नंदूरबारच्या प्रतीक कदम, नवापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची प्रिती पाडवी आणि चोपडा येथील महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहित रायसिंग या तिघांचा समावेश आहे. नवी दिल्ली येथे १ जानेवारी पासून होणाऱ्या संचलन शिबीरात हे तिघे सहभागी होवून महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील. निवड झालेल्या या स्वंयसेवकांचे कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील, प्र-कुलगुरू प्रा. पी.पी. माहुलीकर, व्य.प. सदस्य दिलीप पाटील, रा.से.यो. चे राज्य कार्यअधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे, विभागीय संचालक डी. कार्तीकेयन, प्रभारी कुलसचिव प्रा. बी.व्ही. पवार यांनी अभिनंदन केले आहे. रा.से.यो. संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी परीश्रमपुर्वक स्वयंसेवकांची निवड करून त्यांच्याकडून तयारी करून घेतली. त्याबद्दल डॉ. नन्नवरे यांचेही अभिनंदन करण्यात आले. रा.से.यो. जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. विजय मांटे, धुळे जिल्हा समन्वयक डॉ. वाल्मिक आढावे, नंदुरबार जिल्हा समन्वयक डॉ. माधव कदम यांनीही या तिघांचे अभिनंदन केले.