विष्णू भंगाळे व डाॅ.हर्षल माने यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:13 AM2021-06-04T04:13:01+5:302021-06-04T04:13:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महानगरपालिकेत भाजपचा कार्यक्रम लावून, सत्ता संपादन करणाऱ्या शिवसेनेने आता जिल्हा पातळीवर मोठे फेरबदल करत ...

Selection of Vishnu Bhangale and Dr. Hershal Mane as Shiv Sena District Head | विष्णू भंगाळे व डाॅ.हर्षल माने यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड

विष्णू भंगाळे व डाॅ.हर्षल माने यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महानगरपालिकेत भाजपचा कार्यक्रम लावून, सत्ता संपादन करणाऱ्या शिवसेनेने आता जिल्हा पातळीवर मोठे फेरबदल करत जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी माजी महापौर विष्णू भंगाळे व डॉ.हर्षल माने या दोघांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. तर विद्यमान जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांची बढती करत त्यांची सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात शिवसेनेत पहिल्यांदाच तीन विधानसभांसाठी एक जिल्हाप्रमुख अशी नियुक्ती करण्यात आली असून, शिवसेनेने आता जिल्ह्यात संघटनवाढीसाठी आक्रमकपणे विस्तार करण्याचा निर्णय या निवडीवरून घेतला असल्याचे स्पष्ट होत आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी दोन जिल्हाप्रमुख काम करणार असून, रावेर लोकसभा मतदार संघासाठीदेखील लवकरच अशाच पद्धतीने दोन जिल्हाप्रमुख यांची निवड केली जाणार असल्याची माहिती शिवसेनेच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. गेल्या १० वर्षांपासून जळगाव लोकसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुखपद हे गुलाबराव वाघ यांच्याकडे होते. पक्षाने आता वाघ यांना बढती देत, त्यांची जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्ती दिली आहे.

ज्येष्ठ व तरुण नेतृत्वावर टाकला विश्वास

१. महापालिकेचे माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्यावर पहिल्यांदाच शिवसेनेने मोठी जबाबदारी सोपवली आहे. जळगाव महापालिकेतील जेष्ठ नगरसेवकांमध्ये विष्णू भंगाळे यांचाही समावेश होतो. भंगाळे यांच्याकडे जळगाव शहरासोबतच, जळगाव ग्रामीण व अमळनेर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

२.तर जिल्हा परिषदेच्या पारोळा तालुक्यातील मंगरूळ-शिरसमणी या गटातून विजय झालेले डॉ. हर्षल माने यांच्याकडे चाळीसगाव, पाचोरा, पारोळा या तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. माने हे शिवसेनेच्या नव्या फळीतील नेतृत्व असून, युवकांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघातील लवकरच होणार फेरबदल

जळगाव लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच रावेर लोकसभा मतदारसंघातदेखील फेरबदल होऊन त्या मतदारसंघातदेखील दोन जिल्हाप्रमुख यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली आहे. सद्य:स्थितीत रावेर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख म्हणून चंद्रकांत पाटील हेच काम पाहात असल्याची माहिती संपर्क प्रमुख विलास पारकर यांनी दिली आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता, मात्र पक्षाने त्यावेळेस राजीनामा स्वीकारला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हा प्रमुख म्हणून चंद्रकांत पाटील हेच कायम होते, असेही पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

कोट..

मराठवाडा व विदर्भामध्येदेखील तीन विधानसभा मतदारसंघांसाठी एक जिल्हाप्रमुख अशी निवड शिवसेनेने या आधी देखील केली आहे. सेनेचे संघटन व्हावे व जास्तीत जास्त कार्यकर्त्यांपर्यंत जिल्हाप्रमुख यांना पोहोचता यावे यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

- संजय सावंत, संपर्कप्रमुख, जळगाव लोकसभा मतदारसंघ

तूर्तास तरी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी दोनच जिल्हाप्रमुख यांची निवड करण्यात आली आहे. पुढील काळात रावेर लोकसभा मतदारसंघासाठी हे बदल होऊ शकतात. सद्य:स्थितीत रावेर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख पद चंद्रकांत पाटील यांच्याकडेच राहणार आहे.

-विलास पारकर, संपर्कप्रमुख, रावेर लोकसभा मतदारसंघ

Web Title: Selection of Vishnu Bhangale and Dr. Hershal Mane as Shiv Sena District Head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.