३५ लाख रुपये घेऊन सौदा पावती करून दिलेल्या प्लॉटची दुसऱ्यालाच विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:36+5:302021-07-05T04:12:36+5:30
जळगाव : सौदापावती, नोटरी करून व्यवहारातील ३५ लाख रुपये घेऊन संबंधित प्लॉटची दुसऱ्याला विक्री केल्याचा प्रकार धरणगाव येथे ...
जळगाव : सौदापावती, नोटरी करून व्यवहारातील ३५ लाख रुपये घेऊन संबंधित प्लॉटची दुसऱ्याला विक्री केल्याचा प्रकार धरणगाव येथे उघडकीस आला असून सुनील मधुकर चौधरी व अनिता चौधरी या दांपत्याची फसवणूक झाली आहे. दरम्यान, याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाधिकाऱ्यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही त्याला जामीन मंजूर असल्याचे खोटे सांगून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप सुनील चौधरी यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणात संशयितांना अटक करावी व तपासाधिकाऱ्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सुनील व अनिता या दांपत्याचा प्लॉट खरेदी, विक्रीचा व्यवसाय आहे. विजय छंदलाल गाडीलोहार (रा.कल्याण) याने धरणगाव येथील प्रतिभा भालचंद्र बागुल व मयूर भालचंद्र बागुल यांच्याशी त्यांच्या मालकीचे शेत गट क्र.५३८/१/१ धरणगाव शिवारातील शेत मिळकतीचा सौदा २३ डिसेंबर २०१५ रोजी केला होता. त्यापोटी लोहार व बागुल यांनी ११ जानेवारी २०१६ ते ११ जानेवारी २०१७ या कालावधीत ३५ लाख रुपये घेऊन सौदापावती व नोटरी करून दिली. एन.ए. झाल्यावर प्लॉट खरेदी करून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली, मात्र जेव्हा प्लॉट एन.ए. झाला तेव्हा तिघांनी तिसऱ्याच व्यक्तींना यातील काही प्लॉट खरेदी करून दिला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रतिभा बागुल, मयूर बागुल व विजय गाडीलोहार या तिघांविरुध्द धरणगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
संशयिताला आधी अटकपूर्व मंजूर, नंतर रद्द
गुन्हा दाखल झाल्यानंतर विजय लोहार याने जळगाव न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. चौधरी यांनी त्यास हरकत घेतली असता लोहार याने ३५ लाख रुपये घेतल्याचे मान्य करून ३१ मार्च २०१९ पर्यंत प्लॉट खरेदी करून देण्याच्या अटी-शर्तीवर न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. दरम्यान, यानंतर लोहार याने रहिवासाचे ठिकाण बदल केले. त्यामुळे न्यायालयाच्या नोटिसा त्याला मिळू शकल्या नाहीत. स्थानिक पोलिसांना तसा अहवाल न्यायालयाला सादर केल्यानंतर त्याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात आला. दरम्यानच्या काळात तपासाधिकारी हनुमंत गायकवाड यांनी लोहार याला वगळून इतर दोघांविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करायचा प्रयत्न करून लोहार याला अटकपूर्व मंजूर असल्याचे धरणगाव न्यायालयात खोटे सांगून दिशाभूल केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. पोलीस संशयितांना मदत करीत असल्याचे निदर्शनास आल्यावर न्यायालयाने त्यात त्रुटी काढल्या व दोषारोपपत्र दाखल करून घेण्यास नकार दिला. दरम्यान, याप्रकरणात हनुमंत गायकवाड यांचीही चौकशी व्हावी व लोहार याच्याविरुध्द कारवाई व्हावी, अशी मागणी तक्रारदार चौधरी दांपत्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
कोट....
माझी बदली झालेली आहे. गुन्ह्याचे सर्व कागदपत्रे तसेच न्यायालयाचे वेळोवेळी आलेले आदेश सर्व नवीन अधिकाऱ्यांकडे हस्तांतर केलेले आहे. या गुन्ह्याशी माझा आता काहीही संबंध राहिलेला नाही.
-हनुमंत गायकवाड, तत्कालीन पोलीस निरीक्षक