केळी प्रक्रिया उद्योगावर १ रोजी चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:30+5:302021-06-30T04:11:30+5:30
सावदा, ता. रावेर : भारत सरकारच्या आजादी का अमृत महोत्सव या माध्यमातून ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या योजनेच्या ...
सावदा, ता. रावेर : भारत सरकारच्या आजादी का अमृत महोत्सव या माध्यमातून ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या योजनेच्या माध्यमातून १ जुलै रोजी सकाळी १० ते संध्याकाळी चारपर्यंत राष्ट्रीय पातळीवर केळीवर ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात देशातील नामवंत केळी तज्ज्ञ शेतकऱ्यांना केळी प्रक्रिया उद्योग व केळी रोग निर्मूलन या विषयांवर मार्गदर्शन करतील. यात जळगाव जिल्ह्यातील केळी तज्ज्ञांचा समावेश असणार आहे.
पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील तीन संस्था एकत्र
केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी भारत सरकारच्या राष्ट्रीय पातळीवरील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तीन संस्था एकत्र येत केळी उत्पादक शेतकऱ्यांना विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करणार आहेत. भारतीय खाद्य प्रसंस्करण प्रौद्योगिकी संस्थान, राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र व कृषी और प्रसंस्कृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण या भारत सरकारच्या तीन राष्ट्रीय संस्था एकत्र येत या चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
या चर्चासत्राचे मुख्य अतिथी म्हणून अपेडाचे चेअरमन डॉ. एम. अंगामुथ्यू, राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या डायरेक्टर डॉ. एस. उमा, डॉ. एस. आनंद धर्मा किशन यांच्यासह देशभरातील विविध केळी तज्ज्ञ, तर जळगाव जिल्ह्यातील के. बी. पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.