तुरटीच्या ठेक्याच्या मुद्द्यावरून सेना नगरसेवक प्रशांत नाईक यांचे घुमजाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:13 AM2021-07-01T04:13:07+5:302021-07-01T04:13:07+5:30
स्थायीच्या सभेत मिळाली मंजुरी : सभापतींना निवेदन देऊन रात्रीतून मागविले परत; ‘प्रशांत’मुळे शिवसेना झाली ‘परेशान’ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...
स्थायीच्या सभेत मिळाली मंजुरी : सभापतींना निवेदन देऊन रात्रीतून मागविले परत; ‘प्रशांत’मुळे शिवसेना झाली ‘परेशान’
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - उमाळा जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी जलशुद्धीकरणासाठी तुरटी (ॲलम) खरेदीच्या निविदेत घोळ असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केला होता. तसेच याप्रकरणी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांना निवेदन देऊन हा विषय रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देखील नाईक यांनी दिले होते. मात्र, स्थायी समितीच्या सभेत या विषयावरून नाईक यांनी घुमजाव करत याप्रकरणी सभेत कोणताही खुलासा केला नाही. तसेच त्यांच्याच पक्ष असलेल्या शिवसेनेने हा विषय बहुमताने देखील स्थायीमध्ये मंजूर करून घेतल्याने ‘ॲलम’च्या मुद्द्यावरून माघारीचे गौडबंगाल नेमके काय ? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
मनपा स्थायी समितीची ऑनलाइन सभा सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेपूर्वी मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या ॲलम खरेदीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले होते. शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी या निविदा प्रक्रियेत चौथ्या निविदाधारकावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. तसेच मनपा प्रशासनावर देखील गंभीर आरोप केले होते. तसेच हा ठराव रद्द करण्याबाबत सभापतींशी पत्रव्यवहार करून, हा विषय रद्द करण्याची मागणी केली होती. या मुद्द्यावरून सभेत गोंधळ होईल, अशी शक्यता असतानाच, नाईक यांनी सभापतींना दिलेले पत्र रात्रीतून मागे घेतले. तसेच सभेत देखील प्रत्यक्षात सभापती, भाजप नगरसेवक यांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर दिलेच नाही. यामुळे नाईक यांच्या भूमिकेवर भाजप नगरसेवकांनी देखील सभेत शंका उपस्थित करून या ठरावाला आपला विरोध केला.
प्रश्न नाईक यांना, उत्तरे मात्र नितीन लढ्ढांनी दिली
ऑनलाइन बैठकीत प्रशांत नाईक देखील ऑनलाइन उपस्थित होते. मात्र, ॲलमचा विषय येताच, नाईक ऑफलाइन झाले. सेना सदस्य नितीन लढ्ढा यांनी हा विषय मंजूर करण्यास सांगितल्यानंतर भाजप नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे व सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी याबाबत नाईक यांनी आरोप केल्याने या विषयाची माहिती सभेत द्यावी, असा आग्रह धरला. मात्र, नाईक यांना उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे नाईक यांनी न देता नितीन लढ्ढा यांनी दिली. त्यावर सभापती घुगे-पाटील यांनी पेपर नाईक यांचा असताना त्यांच्या पेपर नितीन लढ्ढा का देत आहेत ? असा चिमटा घेतला.
जास्त दराच्या निविदेला मंजुरी
उमाळा जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दरात गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल २५०० रुपयांची वाढ करण्यात आल्याने मनपाच्या तिजोरीवर यामुळे भार पडणार आहे. मात्र, असे असताना देखील तसेच स्थायीतील सत्ताधारी पक्षाचे सदस्य नाईक यांनी आक्षेप घेत असतानाही या विषयावर सभेत कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, प्रशांत नाईक यांच्यामुळे शिवसेना सदस्यांना उत्तरे देताना चांगलेच ‘परेशान’ केले.
भाजपचा विरोध, सेनेचा पाठिंबा
ॲलम खरेदीच्या निविदेच्या प्रस्तावाला स्थायी सभेत मंजुरी मिळाली असून, भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे, अमित काळे व मुकुंदा सोनवणे यांनी या प्रस्तावाला विरोध केला, तर शिवसेनेसह इतर सदस्यांनी या ठरावाला बहुमताने मंजुरी दिली आहे.