सेना-राष्ट्रवादीची आघाडी होईल न होईल पण स्वबळाची तयारी ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:19 AM2021-09-26T04:19:47+5:302021-09-26T04:19:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आगामी काळात सेना-राष्ट्रवादीची आघाडी होणार किंवा नाही हे भविष्यात समजेल मात्र आपणही स्वबळाची तयारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आगामी काळात सेना-राष्ट्रवादीची आघाडी होणार किंवा नाही हे भविष्यात समजेल मात्र आपणही स्वबळाची तयारी ठेवावी असा सुचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शनिवारी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या कार्यालयातील शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील आणि इंदिरा पाटील यांच्या राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशावेळी दिला. राष्ट्रवादी कार्यालयात स्वबळाचा इशारा देणाऱ्या भुजबळ यांनी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात झालेल्या ओबीसी आरक्षण परिषदेतवेळी मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची तोंडभरून स्तुती केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शनिवारी सकाळी छगन भुजबळ यांनी भेट दिली. त्या सोहळ्यात चोपड्याचे कैलास पाटील आणि इंदिरा पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. कैलास पाटील हे गेल्या काही वर्षांपासून माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. मात्र, ही नाराजी काही काळाची नव्हती. गेल्या चार ते पाच वर्षांपासून त्यांचा हा सूर होता. त्यांना सहजतेने राष्ट्रवादीत आणले गेले. हा शिवसेनेला एक धक्का मानला जात आहे. यावेळी भुजबळ यांनी भविष्यात कदाचित स्वबळावर लढण्याची गरज पडू शकते. त्यासाठी आतापासूनच तयारी करून ठेवलेली बरी, असा सुचक इशारा यावेळी दिला.
छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात छगन भुजबळ यांनी आपले कॅबिनेटमधील सहकारी गुलाबराव पाटील यांचे तोंडभरून कौतुक केले. त्यांचा ओबीसींच्या प्रश्नावर कसा पाठिंबा असतो, याचे दाखले देखील दिले. त्याचसोबत भाजपवर टीका केली. जर तुम्ही येथे काम केले तर तुमच्याकडे इन्कम टॅक्स विभाग येईल. त्याला जर घाबरत असाल तर थेट भाजपात जा.. तेथे अगदी क्लीन व्हाल, असे वक्तव्यही केले.
सकाळी अजिंठा विश्राम गृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘महाराष्ट्र सदनात काहीही चुकीचे नाही. पण, मी आता त्या निर्मिकावरच सर्व काही सोपवले आहे. नियतीच काय ते बघून घेईल. कुणाच्याबद्दल मनात राग नाही.’
कपिल पाटील यांनी जीव वाचवला
छगन भुजबळ यांनी आमदार कपिल पाटील यांनी जीव वाचवला असल्याचे वक्तव्य केले. ते म्हणाले की, ‘तुरुंगात असताना तब्येत खालावली होती. त्याची माहिती आमदार कपिल पाटील यांना मिळाली. त्यांनी लागलीच त्यावर विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर शरद पवार यांनीही राज्य सरकारला पत्र लिहिले. मग औषधोपचार वेळेत मिळाले.’