भाजपच्या बहुमताला सुरुंग लावत सेनेचा जळगाव मनपावर झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:16 AM2021-03-19T04:16:04+5:302021-03-19T04:16:04+5:30

जळगाव : मनपाच्या महापौर व उपमहापौर पदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन या भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा १५ ...

Sena's flag on Jalgaon Municipal Corporation, undermining BJP's majority | भाजपच्या बहुमताला सुरुंग लावत सेनेचा जळगाव मनपावर झेंडा

भाजपच्या बहुमताला सुरुंग लावत सेनेचा जळगाव मनपावर झेंडा

Next

जळगाव : मनपाच्या महापौर व उपमहापौर पदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन या भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव करीत महापौरपदी विराजमान झाल्या. जयश्री महाजन यांना ४५ मतं मिळाली तर प्रतिभा कापसे यांना ३० मतं मिळाली. उपमहापौरपदीदेखील भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी भाजपचे उमेदवार सुरेश सोनवणे यांचा १५ मतांनी पराभव केला. भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने व एमआयएमच्या ३ नगरसेवकांनीदेखील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेनेने बहुमतापेक्षाही जास्त मते मिळविली. राष्ट्रवादीच्या सांगली मनपातील भाजपकडून सत्ता हिरावून घेण्याच्या पॅटर्नचीच सेनेने जळगावात पुनरावृत्ती करीत भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली आहे.

मनपाच्या २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचा एकतर्फी पराभव करून ७५ पैकी ५७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले होते. मात्र अडीच वर्षांतच भाजपला महापालिकेतील सत्ता गमवावी लागली आहे. आमदार सुरेश भोळे यांच्याविरुद्ध असलेली नाराजी, तक्रारींची दखल न घेणे, भाजपकडून देण्यात आलेल्या उपमहापौर पदाच्या उमेदवाराला असलेला विरोध यामुळे भाजपचे तब्बल २७ नगरसेवक शिवसेनेला जाऊन मिळाले. त्यानुसार गुरुवारी झालेल्या ऑनलाइन निवडणुकीत शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे यश मिळवत भाजप उमेदवारांना धूळ चारली.

भाजपची चमत्काराची अपेक्षा ठरली फोल

माजी मंत्री गिरीश महाजन हे भाजपसाठी गेल्या काही वर्षांपासून संकट मोचक ठरत आहेत. त्यामुळे मनपातील भाजपचे संकट गिरीश महाजन हे दूर करतील, अशी अपेक्षा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना लागून होती. मात्र, या निवडणुकीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्याने संकट मोचकालादेखील भाजपचे हे संकट टाळता येऊ शकले नाही.

भाजप सर्वोच्च न्यायालयात जाणार

मनपाच्या महापौर, उपमहापौर निवडप्रसंगी शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्या अर्जाला भाजपकडून हरकत घेण्यात आली. पीठासन अधिकाऱ्यांनी भाजपची हरकत फेटाळून लावत अर्ज वैध ठरवला आहे. दरम्यान, पीठासन अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा भाजप नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी दिला आहे.

Web Title: Sena's flag on Jalgaon Municipal Corporation, undermining BJP's majority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.