सैनिकांसाठी पाठविल्या राख्या व शुभेच्छा पत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:59 PM2018-08-20T16:59:45+5:302018-08-20T17:00:17+5:30
निमगव्हाण जि.प.शाळा व युवकांचा अभिनव उपक्रम
चोपडा, जि.जळगाव : ‘एक धागा शौर्याचा, एक राखी अभिमानाची’ या तत्त्वाला अनुसरून निमगव्हाण, ता.चोपडा येथे जिल्हा परिषद केंद्रशाळेतील विद्यार्थिनी व गावातील सेवाभावी युवकांनी सीमेवर तैनात सैनिकांसाठी राख्या व शुभेच्छा पत्र पाठविले आहेत. या उपक्रमाद्वारे सीमेवरील सैनिकांना सुमारे १०० शुभेच्छा पत्रे व राख्या पाठविल्या.
भारतीय सैनिक सलग बाराही महिने संरक्षणासाठी सीमेवर डोळ्यात तेल घालून काम करत असतात. त्यामुळे त्यांना रक्षाबंधन या महत्त्वाच्या सणालाही आपल्या बहिणीच्या हाताने राखी बांधायला येणे शक्य होत नाही. अशा सैनिकी भावांचा या सणाच्या दिवशी उत्साह वाढावा, त्यांच्या हातून अखंडपणे चांगली देशसेवा घडावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून निमगव्हाण जि.प.शाळा व गावातील सेवाभावी युवकांच्या पुढाकाराने व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिल बाविस्कर, ग्रामपंचायत सदस्य संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तथा संकल्पनेतून शाळेच्या प्रांगणावर हा अभिनव उपक्रम पार पडला.
उपक्रम यशस्वीतेसाठी प्राथमिक शिक्षक राजेंद्र पारधी, ज्ञानेश्वर बाविस्कर, उज्वला जोशी आदी शिक्षक वृंदासह युवा ग्रामपंचायत सदस्य अनिल बाविस्कर, अनिल पाटील, नरेंद्र मैराळे, लीलाधर बाविस्कर, उमेश बाविस्कर, किशोर बाविस्कर यांनी सहकार्य केले.
उपक्रमासाठी निमगव्हाणचे रहिवासी सी.आर.पी.एफ चे जवान रूपचंद बाविस्कर , पुणे पोलीस शेखर बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभल्याचे मुख्याध्यापक अब्दुल पटेल यांनी सांगितले.