त्र्यंबकेश्वर, आळंदी, सासवड येथे मुक्ताईनगर येथून प्रतिनिधी पाठवून निवृत्तीनाथ, ज्ञानदादा, सोपानदादा तिन्ही भावांना मुक्ताईने बांधली राखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 03:37 PM2020-08-03T15:37:16+5:302020-08-03T15:37:39+5:30
बहिण संत मुक्ताबाईकडून बंधू संत निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर, ज्ञानेश्वर माऊली आळंदी, संत सोपानकाका सासवड येथे श्री संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर येथून पाठविलेली राखी बांधण्यात आली. संत परंपरेतील हे रक्षाबंधन अखंडपणे पार पाडले जात आहे.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन हा नारळी पौर्णिमा या शुभमुहूर्तावर बहिण संत मुक्ताबाईकडून बंधू संत निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर, ज्ञानेश्वर माऊली आळंदी, संत सोपानकाका सासवड येथे श्री संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर येथून पाठविलेली राखी बांधण्यात आली. संत परंपरेतील हे रक्षाबंधन अखंडपणे पार पाडले जात आहे.
राखी पौर्णिमेच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधण्याचा पारंपरिक उत्सव असल्याने श्री संत मुक्ताबाई संस्थान श्रीक्षेत्र कोथळी- मुक्ताईनगर संस्थानाने आजही ही परंपरा जोपासली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बहीण संत मुक्ताईकडून दादा संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव तिन्ही बंधंूच्या गावी मुक्ताई संस्थान कोथळीचे अध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांनी सोमवारी राखीपौर्णिमेच्या सणाला खास प्रतिनिधी पाठवून कोरोना काळातसुध्दा परंपरा कायम राखली.
त्र्यंबकेश्वर येथे संदीप पाटील यांनी सपत्नीक जेष्ठ बंधू श्री संत निवृत्तीनाथांकडे राखी प्रदान केली. संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान अध्यक्ष पवन भुतडा, पुजारी ह.भ.प.जयंत् ामहाराज गोसावी, विश्वस्त ह.भ.प.संजयनाना महाराज यांची उपस्थिती होती.
आळंदी येथे आज सकाळी माऊली ज्ञानदादांना मुक्ताईकडील राखी, रुमाल, टोपी ह.भ.प. विचारसागर महाराज लाहूडकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी प्रमुख अॅड.विकास ढगे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्याकडे सोपविली.
मुक्ताईचे लहान बंधू सोपानदादांना सासवड येथे जावून विजय महाले यांनी मुक्ताईकडील राखी बांधली. यावेळी पुजारी हिरूकाका गोसावी चोपदार हरिभाऊ यांची उपस्थिती होती.