खान्देशात अनेक मंडळांकडून ‘श्रीं’ना निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:14 AM2017-09-01T00:14:47+5:302017-09-01T00:18:51+5:30
जळगावात चिनावल व साकेगावात विसर्जन : नंदुरबारला मिरवणुकीवर जलाभिषेक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव /धुळे/ नंदुरबार : खान्देशात गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी गुरुवारी अनेक सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे ‘श्रीं’चे विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरयाऽऽ..पुढच्या वर्षी लवकर याऽ..अशा घोषणा देत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. नंदुरबारला मिरवणुकांवर वरुणराजाने जलाभिषेक केल्याने उत्साहात भर पडली होती.
धुळे
जिल्ह्यात दोंडाईचा येथील ३३, साक्री तालुक्यातील निजामपूर येथे १०, शिरपूर २५, शिंदखेडा १०, नरडाणा ४, शिरपूर तालुका १, थाळनेर ५, धुळे तालुका ५, साक्री २, सोनगीर ४, धुळे १ असे सार्वजनिक गणेश मंडळांचे एकूण ८९ व एक गाव एक गणपती १ अशा एकूण ९० ‘श्रीं’चे विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीत अभूतपूर्व उत्साह पाहावयास मिळाला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. विसर्जन सोहळ्यात कुठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. नुकत्याच झालेल्या पावसाने भरलेल्या विविध बंधारे, तलावांसह नदीवर मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
नंदुरबार
जिल्हाभरात दुसºया टप्प्यातील गणेश विसर्जन उत्साहात व शांततेत झाले. एकूण २२७ मंडळांतर्फे विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. नंदुरबारात रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. मिरवणुकांदरम्यान सायंकाळी नंदुरबारसह काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने उत्साह संचारला होता.
जिल्ह्यात दुसºया टप्प्यातील अर्थात सात दिवसांच्या गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकांचा उत्साह सकाळपासूनच होता. अनेक लहान- मोठ्या मंडळांनी सकाळी १० वाजेपासूनच मिरवणुकांना सुरुवात केली होती. मोठ्या मंडळांनी दुपारी तीननंतर मिरवणुका काढल्या.
नंदुरबार शहरात १४ मोठ्या तालीम संघांतर्फे मुख्य मिरवणूक मार्गावरून मिरवणुका निघाल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका सुरू होत्या. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नंदुरबारात १७ सीसीटीव्ही कॅमेºयांची नजर मिरवणुकांवर होती.
प्रकाशा येथे तापी पात्रात मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली होती. नावाडीदेखील तैनात करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत जिल्हाभरातील अनेक मंडळे, घरगुती गणपती मूर्ती विसर्जनासाठी या ठिकाणी येत होत्या. पुलावरून मूर्ती विसर्जनासाठी ठिकठिकाणी मोठ्या लाइटांची व्यवस्था करण्यात आली होती.
जळगाव जिल्ह्यात चिनावल (ता. रावेर) आणि साकेगाव (ता. भुसावळ) येथे गणेश विसर्जन करण्यात आले. चिनावल येथे तर विसर्जन मिरवणुकीत स्वत: पोलीसच सहभागी झाले होते. यामुळे वातावरण आणखीनच हलके-फुलके झाले होते. तसेच पोलिसांच्या सहभागामुळे तरूणांचाही उत्साह वाढला होता़ मिरवणुकीतील सहभागाने पोलिसांनाही थोडा विरंगुळा मिळाला़