मुक्ताईनगर स्मशानभूमीतील खळबळजनक प्रकार : अस्थीच गेल्या चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 04:44 PM2020-09-11T16:44:28+5:302020-09-11T16:45:51+5:30
हिंदू स्मशानभूमीतून अस्थी चोरीस गेल्याची धक्कादायक घटना ११ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : शहरातील बºहाणपूर रोडवर असलेल्या हिंदू स्मशानभूमीतून अस्थी चोरीस गेल्याची धक्कादायक घटना ११ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. मयत महिलेच्या नातेवाईकांनी अस्थी चोरीला गेल्याचे लक्षात येताच स्मशानभूमीतच प्रचंड संताप व आक्रोश केला.
शहरातील प्रशिक नगरातील रहिवासी असलेल्या ६५ महिला कोविडचा उपचार सुरू असताना दुर्दैवाने मृत्यू झाला होता. त्यांच्यावर ९ सप्टेंबरला रात्री १२:३० वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर दि.१० रोजी रात्री ८ वाजेपर्यंत नातेवाईकांनी प्रेत व्यवस्थित जळाले की नाही हे तपासले असता अस्थी व्यवस्थित होत्या. मात्र ११ रोजी सकाळी मुलगा नितीन सुधाकर भालेराव व इतर नातेवाईक अस्थी घेण्यासाठी आले. तेव्हा अस्थी चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
झालेल्या प्रकाराने महिलेच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश करून संताप व्यक्त केला. त्यामुळे विधी कशावर आणि कसा करायचा, अशी संतप्त भावना नातेवाईक व्यक्त करू लागले. अखेरीस नातेवाईकांनी स्मशानभूमीतच आंदोलन सुरू केले. नातेवाईकांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. तेव्हा आमदार पाटील लागलीच स्मशानभूमीत पोहोचले. कुटुंबीय व नातेवाईकांच्या भावना जाणून घेत मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड व पोलीस उपनिरीक्षक नीलेश सोळुंके यांना घटनास्थळी प्राचारण केले.
मुख्याधिकारी व पोलीस उपनिरीक्षकांना गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करीत अस्थी चोरणाऱ्या भुरट्या चोरांचा तत्काळ शोध घेण्याचा सूचना केल्या आणि भालेराव कुटुंबियांशी चर्चा करून त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.
याप्रसंगी नगराध्यक्षा नजमा तडवी, मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड, नगरपंचायतचे कार्यालय अधीक्षक अच्युत निळ, कर्मचारी सुनील चौधरी, सचिन काठोके तसेच पोलीस प्रशासनातर्फे पोलीस उपनिरीक्षक निलेश सोळुंके, कैलास भारसके यांना गंभीर प्रकाराबद्दल नातेवाईकांनी प्रशासनाला जाब विचारला. आमच्या नातेवाईकांच्या अस्थि आम्हाला आताच परत आणून द्या अशी मागणी केली. जोपर्यंत नातेवाईकाच्या अस्थी प्राप्त होणार नाही तोपर्यंत त्यांनी तेथेच ठाण मांडून बसण्याचा आग्रह धरला. परंतु आमदार पाटील यांनी त्यांची समजूत काढून तेथे क्वचितच शिल्लक राहिलेल्या राखेवर व अस्थिवर विधी व संस्कार करून विसर्जन करावे, अशी विनंती केली. यामुळे नातेवाईकांनी आमदारांची विनंती स्वीकारून चिमूटभर उरलेल्या राखेवर साश्रूनयनांनी विधी संस्कार केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, महेंद्र मोंढाळे, नगरसेवक पियुष मोरे, मुकेश वानखेडे, संतोष मराठे, संतोष कोळी, मस्तान कुरेशी यांच्यासह बापू ससाने, अनिल पाटील, वसंत भलभले, गोपाळ सोनवणे, प्रफुल्ल पाटील, शुभम शर्मा, सुभाष माळी यांच्यासह कार्यकर्ते, समाजबांधव उपस्थित होते.