दोन दिवसात निर्णय न झाल्यास गंभीर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 01:05 PM2020-07-15T13:05:03+5:302020-07-15T13:05:40+5:30
जळगाव : ज्या तीन महिन्यांच्या व्यवसायातून आमचा नऊ महिन्यांचा खर्च निघत होता. त्या तीन महिन्यात एकाही पैशाची कमाई झाली ...
जळगाव : ज्या तीन महिन्यांच्या व्यवसायातून आमचा नऊ महिन्यांचा खर्च निघत होता. त्या तीन महिन्यात एकाही पैशाची कमाई झाली नाही. कोरोना केवळ व्यापारी संकुलातील दुकानांमुळेच होत आहे का? दाणाबाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, त्यामुळे कोरोनाचा फैलाव होत नाही का? असे प्रश्न उपस्थित करून व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला.
११६ दिवस बंदीस्त असलेल्या व्यापारी संकुलासंदर्भात पुढील दोन दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास जे काही परिमाण होतील, त्याची जबाबदारी प्रशासन अन् शासनाची राहिल, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून आजतागायत दुकान बंद राहिल्यामुळे नाही तर भुकेने मरण्याची वेळ आमच्यावर आली आहे, असे या व्यापाºयांनी सांगितले. ‘आम्ही जळगावात राहतो, हे आमचे दुर्भाग्य आहे का?’ या बॅनरखाली आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यापाºयांनी संताप व्यक्त केला.
शासनाच्या धोरणामुळे शहरातील व्यापारी संतप्त झाले असून यातून मार्ग काढण्याची मागणी करीत आहेत.
नाकर्तेपणा व्यापाºयांच्या माथी का मारला ?
नटवर कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष सपन झुनझुनवाला यांनी ‘आपला नाकर्तेपणा व्यापाºयांच्या माथी का मारला? ११६ दिवस झाले, आमची दुकाने बंद आहेत, तरी जळगावमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे का? असा सवाल त्यांनी केला. फुले मार्केटचे कार्याध्यक्ष राजेश वरयानी यांनी ११६ दिवसात लग्नसराई, रमजान महिना, शालेय युनिफॉर्म अशा स्वरुपाचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. त्यामुळे आमचे संपूर्ण भाडे, घरपट्टी माफ करण्याची मागणी केली. सेंट्रल फुले मार्केटचे माजी अध्यक्ष प्रदीप जैन यांनी उपायुक्तांना केवळ कारवाईसाठी फुले मार्केट व बळीराम पेठेतील दुकानेच दिसतात का? असा सवाल करून आपण कोणत्या कायद्यानुसार दुकाने सील करता अन् पाच, दहा हजार दंड आकारता? असा प्रश्न केला.
यावेळी सराफ व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष स्वरूप लुंकड, सेंट्रल फुले मार्केटचे अध्यक्ष रमेश मताणी, नटवर कॉम्प्लेक्सचे कोषाध्यक्ष विजय अग्रवाल, नाथ प्लाझाचे अध्यक्ष नितीन वाणी, व्यापारी प्रदीप जैन, भास्कर मार्केटचे राजेश पिंगळे, स्टेडियम कॉम्प्लेक्समधील ललित पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय हिराणी यांनी केले.
व्यापारीही उतरले रस्त्यावर
अनलॉक झाले असले तरी महापालिकेने केवळ रस्त्यावरील दुकानांना सम-विषम पद्धतीने व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली असून संकुलांमधील दुकाने उघडण्यास अजूनही परवानगी दिलेली नाही. मंगळवारी सात दिवसांच्या लॉकडाऊननंतर दुकाने उघडतील या आशेने बी.जे.मार्केट, महात्मा फुले, गोलाणी, महात्मा गांधी मार्केटबाहेर संकुलामधील दुकानदारांनी मोठी गर्दी केली होती. १२० दिवसांपासून दुकाने बंद असल्याने प्रशासनाने आता संकुलामधील दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी व्यापाºयांनी केली.
सरकारी कर्मचाºयांना पगार नाही, मग..?
शासनाकडे विविध मार्गांनी महसूल येतो. तरीही मुख्यमंत्री आरोग्य कर्मचारी, पोलिस यांचे पगार देऊ शकत नाही. म्हणे, शासनाकडे पैसा नाही. मुख्यमंत्री आम्हाला सांगतात की, कोणत्याही कर्मचाºयाचा पगार कापू नका. शासनाकडे पगार द्यायला पैसे नसतील तर आमच्याकडे सोन्याचे हंडे भरून ठेवलेत का? असा सवाल सराफ व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष स्वरुप लुंकड यांनी केला.