जामठीत पाणी टंचाईने घेतले गंभीर स्वरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 06:46 PM2018-11-29T18:46:54+5:302018-11-29T18:48:07+5:30
बोदवड तालुक्यातील जामठी येथे पाणी टंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
जामठी ता.बोदवड : येथे असलेले पाण्याचे स्त्रोत तसेच जेथून पाणी पुरवठा होतो अशा योजनांनीही टाकलेली मान यामुळे भर हिवाळ्यात पाणीटंचाईने गंभीर स्वरुप धारण केले असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
जामठी हे गाव जवळपास तीन हजार लोकवस्तीचे असून गावातील तीन प्रभागांना पाण्याच्या वेगवेगळ्या तीन स्त्रोतांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. गावातील प्रभाग क्रमांक एक मधील काही गल्ल्यांना पॉवर हाऊसिंग योजनेच्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक एक हा सरपंचांचा प्रभाग असल्याने या प्रभागास दोन ते तीन दिवसांमधून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येतो म्हणून या प्रभागातील नागरिकांना पाणी टंचाई भासत नाही असे काही नागरिकांचे म्हणणे आहे. प्रभाग क्र तीन मधील नागरिकांना बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा कमी अधिक स्वरूपात होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून या बोअरवेलची मोटार दुरूस्तीअभावी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे प्रभाग क्र एक व तीन मधील काही गल्ल्यांना व संपूर्ण प्रभाग क्र. दोन मधील नागरिकांना ओडिए योजनेद्वारे मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यावरच अवलंबून राहावे लागते. गेल्या काही दिवसांपासून ओडिएचा वीजपुरवठा खंडित झाल्याने तालुक्यासह जामठी गावास महिना उलटून ही पाणीपुरवठा न झाल्याने गावावर तिव्र पाणी टंचाईचे संकट कोसळले आहे. प्रत्येक घरात पाण्याचा ठणठणाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर काही नागरिक टॅन्करव्दारे पाणी विकत घेतांना दिसत आहे. पाणीटंचाईची तिव्रता कमी व्हावी या करिता ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्यावर्षी तीन व या वर्षी तीन कुपनलिकांची निर्मिती केली. मात्र काही ठिकाणी चुकीचे ठिकाण (स्पॉट ) निवडल्याने या कुपनलिकांना पुरेसे पाणी लागू शकले नाही. त्यामुळे काही कुपनलिका पाण्या अभावी बंद अवस्थेत आहे. परिणामी या भागातील पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे.
विशेषत: (प्लॉट परिसर) दरम्यान पर्यायी व्यवस्था असतांनाही नियोजनाच्या अभावामुळे गावास टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे, असे ग्रा.पं.च्या विरोधी सदस्यांकडून सांगण्यात आले.
...मग पाणीपट्टी कशी भरणार?
जामठी गावास वीस ते पंचवीस दिवस उलटूनही पाणीपुरवठा होत नसल्याने तसेच महिन्यातून दोन वेळा व वर्षातून फक्त चोवीस किंवा वीसच वेळा पाणीपुरवठा होतो. महिना - महिना उलटून ही पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीपट्टी कशी भरावी असा संतप्त सवाल नागरिकाकडून ग्रामपंचायतीच्या वसुली कर्मचाºयांना विचारला जात आहे.