सारीचाही गंभीर धोका, दररोज तीन ते चार मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:15 AM2021-04-11T04:15:59+5:302021-04-11T04:15:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या वाढत असताना त्याच सारीचे नवे संकट उभे राहिले आहे. मृतांमध्ये कोरोना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या वाढत असताना त्याच सारीचे नवे संकट उभे राहिले आहे. मृतांमध्ये कोरोना संशयित रुग्णांचा अधिक समावेश असून यात सारीचे अधिक रुग्ण असल्याचे समोर येत आहे. कोरोनासदृश्य लक्षणे असताना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर अशा रुग्णांना सारी असल्याचे निदान केले जाते. सारीने रोज तीन ते चार मृत्यू होत असल्याची गंभीर माहिती आहे.
जळगाव शहरातील नेरीनाका स्मशानभूमीत एका आठवड्यात १५० पेक्षा अधिक अंत्यसंस्कार करण्यात आले. यात बाधितांची संख्या अगदीच कमी हेाती. मात्र, संशयितांचे मृत्यू अधिक असल्याचे गंभीर चित्र होते. नेमकी ही संख्या वाढली कशी अशी माहिती घेतली असता, सारीच्या रुग्णांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले.
काय आहे सारी
सारी म्हणजे सिव्हिअर ॲक्युट रेस्पिरेटरी इलनेस हा एक प्रकारचा विकार असून, यात अत्यंत कमी दिवसांत श्वासोश्वासाची समस्या उद्भवते, अचानक ऑक्सिजनची पातळी खालावते व रुग्ण अचानक दगावू शकतो. या लक्षणांमध्ये सर्वांत आधी कोरोनाची टेस्ट केली जाते. ती बाधित आली म्हणजे कोरोनाचे निदान केले जाते, मात्र, ही टेस्ट निगेटिव्ह असली म्हणजे अशा रुग्णाला सारीचा रुग्ण म्हणून संबोधले जाते, असे औषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी सांगितले. शंभरांतून तीन ते चार टक्के यात मृत्युदर असल्याचे त्यांनी सांगितले.
मृत्यू वाढले
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रोज होणाऱ्या मृत्यूचे परीक्षण करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती रोज होणाऱ्या मृत्यूची नोंद घेत असते. यात २४ मार्चपासून ही समिती कार्यरत असून, तेव्हापासून रजिस्टरमध्ये केलेले नोंदीनुसार शंभरांपेक्षा अधिक मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहेत. मात्र, यात अनेक संशयित रुग्णांचा समावेश आहे. अनेकांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. संशयित रुग्णांना सारीचा रुग्ण म्हणूनच संबोधले जाते, असेही काही डॉक्टरांनी सांगितले.
रोजचे २०-२५ रुग्ण
सारीचे रोज किमान २० ते २५ रुग्ण समोर येत आहेत. मात्र, पहिल्या लाटेत व दुसऱ्या लाटेत या रुग्णांची संख्या जवळपास सारखीच असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अनेक संशयितांचे मृत्यूनंतर स्वॅब घेतले जातात, ते निगेटिव्ह येत असल्याचे प्रमाण कमी असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात ७५८ सारी प्रतिबंधित क्षेत्र
शासकीय माहितीनुसार जिल्ह्यात सारी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून, असे जिल्ह्यात ७५८ प्रतिबंधित क्षेत्र आहेत, यात ग्रामीण भागात ५८४, शहरी भागात १६१, तर मनपा हद्दीत असे १३ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. यानुसार सारीच्या रुग्णांमध्ये वाढ नोंदविण्यात येत आहे.