लेकी म्हणाल्या,‘तलाठी’ व्हायचं...विधवा म्हटल्या ‘आधार’ व्हायचं; पोलीस पाल्यांची अनुकंपा भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2023 04:08 PM2023-10-04T16:08:01+5:302023-10-04T16:08:20+5:30
‘बाई गं’ म्हणत परतलेले उमेदवार पुन्हा येणार ७ दिवसांनी
-कुंदन पाटील
जळगाव : जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या अनुकंपाधारक पाल्यांसाठी ‘महसुल’ विभागात सेवेची संधी उपबल्ध करुन दिली आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या १० जागांसाठी १बुधवारी कागदपत्रे पडताळणीसाठी १० उमेदवार हजर झाले. त्यात ८ महिला तर २ पुरुष उमेदवारांनी हजेरी लावली आणि तलाठी की लिपीक, या प्रश्न केल्यावर पोलिसांच्या उच्चशिक्षीत लेकींनी ‘आम्हाला तलाठी व्हायचयं’ म्हणत या भरती प्रक्रियेविषयी आनंद व्यक्त केला. तर पोलीस कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नींनी अनुकंपाभरतीच्या माध्यमातून कुटूंबासाठी ‘आधार’ व्हायचं, अशी भावना त्यांच्या चेहऱ्यावरुन प्रकट झाली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतीक्षा यादीत तरतूद असूनही यापूर्वी पोलीस पाल्यांना संधी दिली जात नव्हती. त्यामुळे या उमेदवारांचे भवितव्य केवळ पोलीस दलातील रिक्त होणाऱ्या जागांवरच अवलंबून राहत होते. त्यामुळे काही जण वयोमर्यादेची अट ओलांडून बसत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला आणि पोलीस दलातील अनुकंपाधारकांना जिल्हास्तरीय सामायिक यादीत स्थान देण्याची मागणी केली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गृह सचिवांकडे प्रस्ताव पाठविला. त्यांनीही मंज़ुरी दिल्याने या २४ उमेदवारांच्या भवितव्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील ७ तलाठी आणि पुरवठा विभागातील ३ रिक्त लिपीकांच्या पदभरतीसाठी १० उमेदवारांना बुधवारी बोलाविण्यात आले होते. त्यानुसार ८ महिला तर २ पुरुष उमेदवार हजर झाले. विशेष म्हणजे, हजर झालेल्या बहुतांश लेकी बी.ई., एम.कॉम, बी.कॉम. शिक्षीत असल्याचे स्पष्ट झाले.
‘बाई गं’ म्हणत परतल्या...
बुधवारी हजर झालेल्या सर्वच उमेदवार पुणे, नाशिकसह अन्य लांबवरच्या शहरातून आल्या होत्या. कुणी तात्पुरत्या ‘जॉब’ तर कुणी शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्याचे सांगत होत्या. त्यामुळे सर्वच उमेदवार कुटूंबाचे संमती व हमीपत्र आणायला विसरल्या. तेव्हा तहसीलदार पंकज लोखंडे, अव्वल कारकून योगेश पाटील, नम्रता नेवे, वैशाली पाटील यांनी हमी व संमतीपत्र आवश्यक असल्याचे सांगितले. त्यासाठी ७ दिवसांची मुदतही दिली. तेव्हा ‘बाई गं’ म्हणत परतलेल्या लेकी ‘आम्ही ७ दिवसांनी पुन्हा येऊ’ असा प्रतिसाद देत समाधानी मनाने घराकडे रवाना झाल्या.
‘तलाठी’पदासाठी संधी
कारकूनपदाच्या ३ जागा आहेत. सुरुवातीच्या तीन उमेदवारांनी या पदाला पसंती दिल्यास अन्य ७ उमेदवारांना तलाठीपदावर रुजू व्हावे लागणार आहे. त्यामुळे किमान ५ लेकींच्या गळ्यात तलाठीपदाची माळ पडणार आहे.
४ विधवांना मिळणार आधार
१० उमेदवारांमध्ये मयत पोलिसांच्या प्रत्येकी ४ पत्नी व मुली आणि २ मुलांनी हजेरी लावली.
अनुकंपाधारकांचे नाते : छाया चैत्राम झटके (पत्नी)
किनगाव), दामिनी धर्मेंद्र महाजन (पत्नी), शीतल राजेश राजपूत (मुलगी), रितेश विजय पवार (मुलगा), सोनाली रमेश कोळी (मुलगी), हर्षल ब्रिजलाल पाटील (मुलगा), सोनल विकास विचवेकर (पत्नी), सुजाता चारुदत्त चौधरी (पत्नी), रेणूका रमेश पाटील (मुलगी), मृणाल मधुकर मेहरुणकर (मुलगी).