शंभर रुग्णांची प्रतिदिन ‘क्षुधा’ भागविणारे सेवालय ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:28 AM2021-02-06T04:28:26+5:302021-02-06T04:28:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गरीब, गरजू लोकांची भूक भागविण्याचे समाजोपयोगी कार्य करणाऱ्या सेवालयाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गरीब, गरजू लोकांची भूक भागविण्याचे समाजोपयोगी कार्य करणाऱ्या सेवालयाची सेवा परवानगीअभावी ११ महिन्यांपासून ठप्प आहे. लॉकडाऊनमध्ये बंद झालेला हा उपक्रम सुरळीत झाल्यानंतरही सुरू करण्यास प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने बंदच आहे. यामुळे गरीब रुग्ण मात्र सेवालय पूर्ववत होण्याची वाट बघत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात नियमित शंभर रुग्णांना अन्नदान व गर्भवती महिला, गरोदर मातांना साजूक तुपाची खिचडी दिली जात होती. सायंकाळी सहा वाजता रुग्णांची लांब रांग या सेवालयासमोर लागत असे. समाजातून अनेक दातेही यासाठी पुढे सरसावले होते. आताही अनेक दाते यासाठी मदत करायला तयार आहेत, मात्र, प्रशासकीय मंजुरी मिळत नसल्याने ही सेवा ठप्प आहे. जनकल्याण समितीचे दीपक घाणेकर, विनोद कोळी, पंडित कासार, आर. सी. चौधरी, प्रकाश यावलकर, पराग महाशब्दे यांच्यासह वीस जणांच्या टीमने अन्नदानासाठी पुढाकार घेतला होता. दरम्यान, या टीमने गुरुवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेऊन हे सेवालय सुरू करण्याची मागणी केली.
अनेक महिने सेवा होती सुरूच
लॉकडाऊननंतर सेवालय बंद झाल्यानंतर जनकल्याण समितीमार्फत बाहेर धान्य, किराणा वाटप केले जात होते. सेवेत खंड पडू दिला नसल्याचे जनकल्याण समितीचे दीपक घाणेकर यांनी सांगितले. आम्हाला विचारणा होत असते की सेवालय कधी सुरू करीत आहेत. अत्यंत चांगला उपक्रम आहे. गरीब रुग्णांना पोटभर जेवण मिळते, प्रशासनाने संवेदनशीलपणे याकडे बघावे, असे आवाहनही घाणेकर यांनी केले आहे.
सेवालयाच्या ठिकाणी काय?
सेवालयाच्या जागेत आता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे कार्यालय आणि जनसंपर्क कक्ष सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणीही रुग्णांना योजनेत कोणते आजार आहेत, याची माहिती देण्यासाठी अन्य सहकार्य केले जात आहे.
कोट
सध्या कोविड आणि नॉनकोविड एकत्रित सेवा सुरू आहे. शिवाय सेवालयाच्या जागेत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे ऑफिस आहे. आम्ही पर्यायी जागा शोधून लवकरच याबाबत निर्णय घेणार आहोत.
- डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता
फोटो आहे