साडेसात हजार स्नातकांच्या पदव्या पाठविल्या पोस्टाद्वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:17 AM2021-05-21T04:17:46+5:302021-05-21T04:17:46+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत समारंभ ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पडला. प्रत्यक्ष पदवी बहाल ...
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत समारंभ ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पडला. प्रत्यक्ष पदवी बहाल न करता आल्यामुळे पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना पाठविण्याची मोहिम विद्यापीठाने हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात साडे सात हजार विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र पोस्टात पाठविण्यात आलेले आहे. लवकरच हे प्रमाणपत्र संबंधित विद्यार्थ्यांना प्राप्त होतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली.
३ मे रोजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलान घेण्यात आला. यंदा ९९ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. तर २८ हजार ९८ स्नातकांना पदव्या बहाल करण्यात आल्या. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १६ हजार ३५८ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ५ हजार १८९ स्नातक, मानव्य विद्याशाखेचे ५ हजार ३५ आणि आंतर विद्याशाखेचे १ हजार ७९ स्नातकांचा समावेश आहे. त्यामध्ये २६१ पीएच.डी. धारक विद्यार्थी आहेत. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे बी.टेक.चे ४३७ विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल करण्यात आल्या.
डिजिलॉकरमध्ये प्रमाणपत्र उपलब्ध...
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाणपपत्र डिजीलॉकर मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये सन २०१३ अर्थात विद्यापीठाच्या २२ व्या दीक्षांत समारंभापासून पदवी प्राप्त करणाऱ्या एकूण १ लाख २३ हजार ५६४ विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र हे डिजीलॉकर मध्ये डिजीटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांनी या लॉकरच्या माध्यमातून आपले प्रमाणपत्र डाउनलोड करून घेतले आहे. हे प्रमाणपत्र अधिकृत असल्याचे विद्यापीठाकडू सांगण्यात आले.