मालगाडीचे सात डबे घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 10:52 PM2020-03-15T22:52:51+5:302020-03-15T22:53:29+5:30
अडीच तास वाहतूक ठप्प : इतर रेल्वे गाड्यांचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे हाल
भुसावळ : येथील रेल्वे याडार्तून मेल लाईनवर खंडव्याकडे जाण्यासाठी निघालेल्या ४५ डब्यांच्या मालगाडीचे ७ डबे मेन लाईनवर घसरल्याने सुमारे अडीच तास वाहतूक ठप्प झाली. ही घटना १५ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारस घडली.
खंडव्याकडे जाणारी ही रिकामी ४५ डब्याची मालगाडी खंबा क्रमांक ४४६/१७ ते २४ यादरम्यान नागपूर दिल्ली या मेल लाईनवर असताना रुळास तडा गेलेला असल्याने ७ डबे रुळावरुन घसरले. याचा परिणाम प्रवासी गाड्यांवर झाला.
गाडी क्रमांक-२२१२९ पुणे- अजनी हमसफर एक्सप्रेस, ११०५७ मुंबई- अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस १२१४१ मुंबई -पाटलीपुत्र एक्सप्रेस, १२८११ लोकमान्य टिळक- हटिया, ११०३९ कोल्हापूर -गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, १२६५६ चेन्नई- अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस, १२७८० हजरत निजामुद्दीन- वास्को गोवा एक्सप्रेस, १३१४२ पाटलीपुत्र -मुंबई एक्सप्रेस व भुसावळ रेल्वे स्थानकावरून जाणारी भुसावळ -बडनेरा मेमू या गाड्यांवर मालगाडीचे डबे घसरल्याचा परिणाम दिसून आला.
यामुळे सुमारे दोन ते तीन तासापर्यंत प्रवासी गाड्या भुसावळ रेल्वे स्थानकावर तसेच जळगाव, रावेर या रेल्वे स्थानकावर थांबून होत्या.
दरम्यान ९:४५ च्या सुमारास अपलाईन वरून प्रवासी गाड्यांची वाहतूक सुरळीत करण्यात संबंधित कर्मचाऱ्यांना यश आले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची उच्चपदस्थ टीम घटनास्थळी तळ ठोकून होती.