रिमझिम पावसाच्या साक्षीने सप्तसुरांनी उजळली दिवाळी पहाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:14 PM2019-10-29T12:14:45+5:302019-10-29T12:15:19+5:30
हजारो दिव्यांसोबत स्वरचैतन्याचा उत्सव
जळगाव : मिणमिणत्या पणत्या प्रज्ज्वालीत करता करता पहाटेच उजेडाची अनुभूती, उगवता नारायण जस जसा वर सरकत प्रकाश किरणांचा वर्षाव करत सारे तेज भूमंडळी उधळतो, समस्त मानवास आनंद देत जातो तेच तेज, तेच चैतन्य तोच आनंद व सोबतीला रिमझिम पावसाच्या सरींच्या साक्षीने सप्तसुरांची उधळण होत यंदाची ‘दिवाळी पहाट’ उजाडली. निमित्त होते लोकमत सखी मंच आणि प्रकाश चिल्ड्रेन हॉस्पिटल यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित दिवाळी पहाट या मराठी, हिंदी भावगीते, सुगम संगीताच्या सुरेल मैफिलीचे. ‘सूर निरासगर हो.....’ ने सुरुवात होऊन कार्यक्रमाला मिळत गेलेली उंची अगदी शेवटच्या ‘देवा तुझ्या दारी आलो....’पर्यंत गायक कलावंतांनी टिकवून ठेवत रसिकांची दाद मिळविली.
दिवाळीचा आनंद द्विगुणित करता यावा यासाठी लोकमत सखी मंच आणि प्रकाश चिल्ड्रेन हॉस्पिटल यांच्या संयुक्तविद्यमाने रविवारी ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाचे आयोजन काव्यरत्नावली चौकात करण्यात आले होते. या वेळी हजारो पणत्या प्रज्वालित करण्यात आल्या.
आमदार सुरेश भोळे, ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, डॉ. प्राची महाजन, डॉ. प्रकाश महाजन यांच्याहस्ते ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्ज्वालन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रकाश चिल्ड्रेन हॉस्पिटलचे डॉ. गौरव महाजन यांचे स्वागत करण्यात आले. एस.के. आॅईलमिलचे यासाठी सहकार्य मिळाले.
दीपोत्सवासह आर.टी.एंटरटेंटमेंट, अमरावती यांच्या चमूकडून मराठी-हिंदीतील दिवाळी व भक्तीगीतांची ही सुमधूर मैफल गायक कलावंत राहुल तायडे, रोशनी दर्जी, प्राची माडीवाले यांनी बहारदार गीते सादर करून रसिकांची दाद मिळविली. यात सुर निरागस हो, ओम नम: शिवाय, झिनी झिनी वाजे बिन, मन मंदिरा, अधीर मन झाले, केव्हा तरी पहाटे, दिल कि तपीश, आली माझ्या घरी ही दिवाळी, शुक्रतारा, बाजेरे मुरलीया बाजे, आज जाने कि जिद ना करो (मेलडी गझल), हसता हुवा नूरानी चेहरा, एक राधा एक मीरा , मोहें रंग दो लाल, माझे माहेर पंढरी, पिया तोसे नैना, अश्विनी येना, लाल मेरी, देवा तुझ्या दारी आलो... अशा एकाहून एक हिंदी, मराठी गीत, भक्तीगीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली. यात देवा तुझ्या दारी आलो या गणरायाच्या आराधनेने कार्यक्रमाची सांगता झाली. मनीष आत्राम (ढोलक), शीतल मांडवगणे (तबला), सतीश रुद्रकाल (आॅक्टोपॅड), प्रवीण जोंधलेकर (आॅर्गन) यांनी साथसंगत केली.
सूर्यनारायणाच्या साक्षीने सुरांची बरसात
काव्यरत्नावली चौकात पहाटे रसिकांना सहपरिवार फक्त एक पणती घेऊन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक जण सहकुटुंब एक एक पणती घेऊन ती प्रज्ज्वालीत करत कार्यक्रमात सहभागी होत होते. हळूहळू रसिकांच्या उपस्थितीने हा परिसर पूर्ण भरून गेला आणि संगीताची ही मैफल रंगत गेली. सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले.