शिरसोलीत सात माजी सरपंच निवडणूक रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:12 AM2021-01-09T04:12:57+5:302021-01-09T04:12:57+5:30
जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापत आहे. शिरसोली प्र.न. व शिरसोली प्र.बो. या दोन्ही ग्रामपंचायतीसाठी पंचायत समितीच्या ...
जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापत आहे. शिरसोली प्र.न. व शिरसोली प्र.बो. या दोन्ही ग्रामपंचायतीसाठी पंचायत समितीच्या माजी सभापती तसेच उप-सभापती निवडणूक रिंगणात असताना सात माजी सरपंचांनी उमेदवारी दाखल केली आहे. सर्वच ठिकाणी काट्याच्या लढती असल्याने शिरसोलीकरांचे लक्ष लागून आहे.
शिरसोली प्र.न. व प्र.बो. ग्रामपंचायतीसाठी माघार झाल्यानंतरचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही वाॅर्डात सरळ लढत आहे तर काही वाॅर्डात तिरंगी लढत होत आहे. सध्या पंचायत समितीचे माजी सभापती व उप-सभापती निवडणूक रिंगणात आहेत. या दोन्ही लढतींसोबतच माजी सरपंच उभे असलेल्या सात वाॅर्डातील लढतीकडे लक्ष लागून आहे.
ढेंगळे व ताडे यांच्या लढतीकडे लक्ष
पंचायत समितीच्या माजी सभापती आशाबाई मुरलीधर ढेंगळे या शिरसोली प्र.बो.मधील प्रभाग क्रमांक तीनमध्ये उमेदवारी करीत आहेत. तर पंचायत समितीचे माजी उपसभापती श्रावण शंकर ताडे हे शिरसोली प्र.न.मधील प्रभाग २ मधून उमेदवारी करीत आहेत. त्यांच्या विरोधात माजी सरपंच अर्जुन काटोले, भाजपचे तालुका पदाधिकारी गिरीश वराडे यांची उमेदवारी आहे.
सात माजी सरपंच निवडणूक रिंगणात
दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल सात माजी सरपंच निवडणूक रिंगणात आहेत. त्यात शिरसोली प्र.बो. मध्ये प्रभाग तीनमध्ये प्रदीप रावसाहेब पाटील. शिरसोली प्र.न.तील प्रभाग १ मधून काटोले रामकृष्ण परशुराम, प्रभाग २ मध्ये सुरेखा बापू मराठे, काटोले अर्जुन बारकू, प्रभाग ४ मधून शशिकांत वाणी, प्रभाग ५ मधून सोनवणे पुष्पलता शंकर, पाटील अनिल बारकू यांचा समावेश आहे.
मराठा समाजातर्फे महिलांना संधी
शिरसोली प्र.न.ग्रामपंचायतीसाठी मराठा समाजाकडून सर्व ठिकाणी महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्यात द्वारकाबाई तुकाराम बोबडे, सुरेखा बापू मराठे, मिनाबाई पांडुरंग बोबडे, ज्योती संजय सूर्यवंशी, पानगळे अनिता उमाजी, साबळे जमनाबाई देवीदास, मराठे मंगला ज्ञानेश्वर, पाटील सखुबाई मिठाराम, पाटील कोमल निवृत्ती यांचा समावेश आहे.