शहरात एकाच दिवशी आढळले सात बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 11:31 AM2020-05-27T11:31:51+5:302020-05-27T11:32:07+5:30
तांबापुरातील नागरिकाचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटीव्ह : कोरोना योद्धा पोलीस कर्मचाऱ्याचे कुटुंब बाधित
जळगाव : जळगाव शहरात मंगळवारी एकाच दिवशी सात जण बाधित आढळून आले. यापैकी तांबापुरात एकाच्या मृत्यूनंतर अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दुसरीकडे कोरोना योद्धा पोलीस कर्मचाºयासह त्याच्या कुटुंबातील बालकासह तीन जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तांबापुरात तपासणीसाठी गेलेल्या आरोग्य पथकाला काही लोकांनी विरोध केला. त्यामुळे या पथकला माघारी फिरावे लागले.
शहरातील बाधितांची संख्या आता ११३ तर मृत्यू झालेल्यांची संख्या आठ झाली आहे.
शहरात आढलेल्या बाधितांमध्ये दक्षता वसाहतीमधील पोलीस कर्मचारी, त्याची पत्नी व मुलगा. तसेच औद्योगिक वसाहत, तांबापूर, नवलकॉलनी आणि शाहू नगर येथील प्रत्येकी एक अशा सात जणांचा समावेश आहे. तर आठवा रुग्ण हा तरसोद येथील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तांबापुरातील एकाला रविवारी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी दुपारी त्याचा मृत्यू झाला. तत्पूर्वी त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा अहवाल मंगळवारी पॉझिटीव्ह आला. दरम्यान, रविवारी सायंकाळी त्याच्या अंत्ययात्रेत मोठा जमाव सहभागी झाला होता. त्यामुळे तांबापुरात धोका वाढल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, महापालिकेचे पथक सायंकाळच्या सुमारास तांबापुरात पोहचले. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे या पथकाला माघारी फिरावे लागले. बुधवारी सकाळपासून या ठिकाणी आरोग्य सर्वेक्षण सुरु होईल.
दक्षता नगरात बाधित पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या तीन
कोरोनाशी दोन हात करणाºया योध्देही आता कोरोनाने बाधित होऊ लागले आहेत. आरोग्य कर्मचाºयांपाठोपाठ जळगाव पोलीस दलातील तीन कर्मचारी बाधित झाले आहेत. याआधी दोन कर्मचारी बाधित होते. मंगळवारी आलेल्या अहवालात आणखी एक पोलीस कर्मचारी, त्याची पत्नी व मुलगा असे तिघं बाधितअसल्याचा अहवाल आला. हे सर्व पोलीस दक्षता नगर पोलीस वसाहतीत वास्तव्याला आहेत. दरम्यान, हे कर्मचारी रहात असलेल्या इमारतीतील सर्वच कुटुंबाना क्वारंटाईन करण्यात आले आहे. याआधी मालेगाव येथे बंदोबस्ताला गेलेले चार कर्मचारी बाधित झाले होते. त्यांच्यावर नाशिक येथे उपचार करण्यात आले. कोरोनाला हरवून हे कर्मचारी नुकतेच घरी परतले. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके व सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी या चारही कर्मचाºयांचा गौरव करुन कोरोनाशी लढणाºया पोलीस कर्मचाºयांचे मनोबल वाढविले होते.
तरसोदला कोरोनाचा शिरकाव
वृद्ध पॉझिटीव्ह आल्याने खळबळ
नशिराबाद : तालुक्यातील तरसोद गावात बस स्थानक परिसरातील एका ७० वर्षीय वृद्धाचा अहवाल कोरोना बाधित निघाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय चव्हाण यांनी दिली. गेल्या दोन महिन्यापासून सुरक्षित असलेले तरसोदला कोरोनाने एण्ट्री केली आहे. प्रशासनाकडून रात्रीच तो परिसर सील करण्यात आला. सुमारे १२ जणांना कॉरन्टाईन करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली दरम्यान बाधित व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून आजारी होती तिला जळगाव येथे नेण्यात आल्या नंतर तिची स्वॅब घेण्यात आले होते. मंगळवारी रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रात्रीच फवारणी सुद्धा ग्रामपंचायतीच्या तर्फे करण्यात आली.