सात लाखाचा दारुचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:47 PM2019-03-20T12:47:02+5:302019-03-20T12:48:20+5:30
जळगाव : जळगाव व मध्यप्रदेश सिमेवर असलेल्या नवापाडा, रोहणी व भोईटी येथे सात लाख रुपये किमतीची अवैध दारु व ...
जळगाव : जळगाव व मध्यप्रदेश सिमेवर असलेल्या नवापाडा, रोहणी व भोईटी येथे सात लाख रुपये किमतीची अवैध दारु व बियरचा साठा पकडण्यात आला. यात दोन जणांना अटक करण्यात आली. सोमवारी रात्री ही धडक कारवाई सुरु झाली ती रात्री उशिरापर्यंत सुरु होती. दरम्यान, कारवाईला विरोध म्हणून गावकऱ्यांनी पथकाला घेरले होते.
लाल्या वरा पावरा (नवापाडा) व अर्जून सरदार पावरा (सत्रासेन) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथके नेमून कारवाईची मोहीम सुरु केली आहे. नाशिक विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे सोमवारी जळगाव दौऱ्यावर होते. जळगाव व मध्य प्रदेश सिमेवर पंजाब निर्मित अवैध दारुची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन सुर्वे यांनी जळगावचे अधीक्षक एस.एल.आढाव व त्यांच्या पथकाला सोबत घेऊन सोमवारी सायंकाळी चोपडा तालुक्यातील नवापाडा, रोहीणी व भोईटी येथे धाड टाकली. तेथे लाल्या पावरा याच्या घरात विदेशी दारु व बियरचे ८३ खोके आढळून आले, तर वन विभागाच्या सिमा तपासणी नाक्यावर अर्जून पावरा याच्या ताब्यातील चार चाकी वाहनात २७० लीटर दारु निर्मितीचे रसायन (स्पीरीट) आढळून आले. या साºया मुद्देमालाची किमत ७ लाख १४ हजार ६२० रुपये इतकी आहे.
पथकाला कारवाईपासून रोखण्याचा प्रयत्न
लाल्या पावरा याच्या घरातून दारुचा साठा जप्त केल्यावर गावातील काही जणांनी पथकाला घेरुन कारवाई करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. सुर्वे यांनी लागलीच दुसरीकडे थांबलेल्या पथकाला घटनास्थळी बोलावण्यासह धुळे पोलिसांची मदत घेतली. शस्त्रधारी अधिकारी पाहून मद्य तस्कर मागे हटले. तेव्हा दारुचा साठा, वाहन व आरोपींना जळगावला आणण्यात आले. एका जणाला धुळे पथकाच्या ताब्यात देण्यात आले. जळगावचे अधीक्षक एस.एल.आढाव, निरीक्षक संजय कोल्हे, नरेंद्र दहिवडे, दुय्यम निरीक्षक वसंत माळी, महेंद्र सोनार, विकास पाटील, सत्यजीत ठेंगळे, भरत दौंड, वैशाली धनगर यांच्यासह जमादार एच.एन.ब्राम्हणे, रघुनाथ सोनवणे, अमोल पाटील, मुकेश पाटील, सागर देशमुख, विपुल राजपूत, व्ही.बी.परदेशी, राहूल सोनवणे, नंदू नन्नवरे, रवींद्र जंजाळे, नितीन पाटील, शशिकांत पाटील, गिरीश पाटील, नंदू पवार, प्रकाश तायडे व डी.बी.पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
निवडणुकीसाठी विशेष पथके
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथकाची निर्मिती केली आहे. जळगाव, चाळीसगाव व भुसावळ येथे तीन निरीक्षक व त्यांच्या दिमतीला दोन भरारी पथके आहेत. पुरनाड नाक्यावर एक भरारी पथक तर चोरवड येथे निवडणुकीपुरता तात्पुरता सिमा तपासणी नाका तयार करण्यात आला आहे. यात २४ तास एक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती अधीक्षक एस.एल.आढाव यांनी दिली. परराज्यातून येणारे मद्य, अवैध व बनावट मद्य रोखणे व संशयास्पद वाहनांची तपासणी या पथकामार्फत केली जात आहे.